विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी संपल्यानंतर उद्या बुधवारी विदर्भातील ६२ मतदारसंघातील १०३८ उमेदवारांचे भाग्य मतदान यंत्रात बंद होणार आहे. त्यात पूर्व विदर्भात ५५० तर पश्चिम विदर्भातील ४८८ उमेदवारांचा समावेश आहे. विदर्भात सुमारे २ कोटी ६० लाख मतदार असून मतदान सुरळीतपणे पार पडावे यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. गडचिरोली जिल्ह्य़ासह नक्षलवादग्रस्त भाग आणि संवेदनशील मतदान केंद्र परिसरात अभूतपूर्व बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नक्षलवादग्रस्त गडचिरोली, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूरच्या काही भागात दुपारी ३ वाजताच मतदान संपेल, तर अन्य भागात सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान सुरू राहील.
निवडणुकीत कुठलाही गैरप्रकार घडण्याची शक्यता लक्षात घेता जिल्ह्य़ांच्या सीमा सील करण्यात आल्या असून महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश शासनातर्फे सीमेवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येणार आहे. संवेदनशील मतदान केंद्रांवर मतदानाच्या संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडियो चित्रीकरण करण्यात येणार आहे. निवडणुकीच्या तयारीसाठी सर्व शाळांना आज सुटी देण्यात आली. तसेच, उद्या मतदानाच्या दिवशी शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालये, निमसरकारी, खासगी उद्योग सर्व बंद ठेवण्यात येणार आहेत. फक्त आरोग्य, पोलीस, एसटी, विद्युत, बीएसएनल, टपाल खाते यासारख्या अतिमहत्त्वाच्या सुविधा सुरू राहणार आहे. नागपूर जिल्ह्य़ात १२ मतदार संघात २११ उमेदवार रिंगणात आहेत. एकूण मतदार ३६ लाख ४ हजार ६७६ असून त्यात १९ लाख २८ हजार २८६ पुरूष आणि १७ लाख ७६ हजार ३३६ स्त्री आहे. ५३ इतर आहेत. प्रशासनातर्फे जिल्ह्य़ातील सर्वच मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशीन आणि इतर साहित्याची व्यवस्था करण्यात आली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप- शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र निवडणूक लढले असले तरी यावेळी चारही पक्ष स्वबळावर निवडणूक लढत असल्यामुळे प्रत्येक पक्षासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे.
दरम्यान, गेल्या पंधरा दिवसांपासून प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना मतदानाच्या दोन दिवस आधी नागपूर जिल्ह्य़ात आणि शहरात काही ठिकाणी पाऊस पडला असला तरी मंगळवारी मात्र चांगलीच उघड होती. उद्या, मतदानाच्या दिवशी आजच्या सारखेच वातावरण राहिले तर मतदान वाढण्याची शक्यता आहे. विदर्भातील विविध राजकीय पक्षातील उमेदवारांच्या प्रचार कार्यालयात कार्यकत्यार्ंची लगबग वाढली आहे. पोलिंग बुथ आणि मतदान केंद्रांवर राहणाऱ्या
कार्यकर्त्यांंची प्रत्येक पक्षाकडून निवड केली जात आहे. कोण कुठल्या वस्तीमध्ये राहील, मतदारांची नावे कोण शोधऊन देतील, बुथवर कोण राहील, वस्ती सोडून दुसऱ्या भागात गेलेल्या मतदारांना कोण आणेल, कार्यकर्त्यांना नास्ता आदी व्यवस्थाही निश्चित करण्यात आली आहे. मतदानाचा सगळीकडे उत्साह असल्यामुळे शहरातील विविध चौकात, शासकीय, निमशास्कीय कार्यालयात, पानटपरीवर निवडणुकीची चर्चा रंगू लागली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा