मतमोजणी सुरू झाल्यावर एकेक आकडे जसे बाहेर येत गेले तसे सोशल मीडियावर ‘अपडेट्स’ची तुडूंब गर्दी झाली. कोणी आघाडी घेतली, कोण पिछाडीवर याचा चोथा केल्यानंतर तथाकथित विश्लेषक, कार्यकर्ते यांनी पुढची समीकरणे काय असतील याचे चिंतन सुरू केले. मात्र, सर्वसामान्यांनी सोशल मीडियावर निकालानंतरच्या घडामोडींवर खुसखुशीत विनोदी टीकाटिप्पणी करीत निकालाचा आनंद साजरा केला.
राज्यात भाजपला सर्वाधिक मते मिळाली असली तरी एकहाती सत्ता स्थापन करण्याएवढे बहुमत मिळालेले नाही. अशावेळी सत्तास्थापनेसाठी भाजपपाठोपाठ जागा मिळवणाऱ्या शिवसेनेबरोबर पुन्हा युती होण्याची शक्यता आहे का?, या मुद्दय़ावर ट्विटरवर ‘हे दोन्ही पक्ष आता समोरासमोर येतील, गाठीभेटी होतील, एकटय़ाने लढताना किती आठवण आली होती रे मित्रा तुझी? असे काही भावनिक संवाद झडतील. दोन्ही पक्षाचे संख्याबळ एकत्र येईल’ अशी पोल खोलत सर्वसामान्यांनी राजकारणातील छक्केपंजे आपल्यालाही माहीत झाल्याचे दाखवून दिले आहे.  तर ‘भाजपला राज्यात १४५ चा आकडा गाठता आला नाही याचा सगळ्यात मोठा आनंद काँग्रेसला झाला आहे. हे म्हणजे धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीने मला फक्त दमा झाला आहे. फुफ्फुसांचा कर्करोग झाला नाही म्हणून आनंदोत्सव साजरा करण्यासारखे आहे’, अशा शब्दांत काँग्रेसच्या पराभूत मानसिकतेवर ताशेरे ओढले आहेत.  
निवडणूक निकालानंतर सोशल मीडियावर विविध क्षेत्रातील सेलिब्रिटी आणि कलाकारांची गैरहजेरी चांगलीच जाणवणारी आहे. निवडणुकीच्या वेळी मतदान केले म्हणून प्रसिद्धीमाध्यमांसमोर आलेले आणि सोशल मीडियावर आपली छायाचित्रे टाकून मतदान करा.. असा संदेश देणाऱ्या कलाकारांनी आजच्या दिवशी मात्र सोशल मीडियावरची टिवटिव थांबवली आहे. अभिनेता रितेश देशमुखने त्यातल्या त्यात आपला भाऊ अमित देशमुख लातूरमधून निवडून आला, त्याने लातूरचा गड राखल्याची ‘ट्विटर’ वार्ता दिली आहे. तर लोकांनी मात्र भाजपच्या विजयापासून काँग्रेसच्या पराभवापर्यंत प्रत्येक गोष्टीवर आपली उपहासात्मक टीका नोंदवली आहे. राज्यातला काँग्रेसचा दारूण पराभव लक्षात घेऊन राहुल गांधींवर टीकास्त्र सोडण्याची संधी सोशल मीडियावर साधली गेली. ‘राहुल गांधी आणि त्यांची काँग्रेस आपल्याला ४४ जागा मिळाल्या याचाही आनंद व्यक्त करत सुटली आहे. कारण, लोकसभेत त्यांच्या हाती जे काही लागले त्यापेक्षा ही संख्या जास्त आहे’, ‘राहुल गांधी का है सपना, काँग्रेसमुक्त हो भारत अपना’, ‘राहुल गांधींनी महिला सक्षमीकरणाचे त्यांनी दिलेले आश्वासन पूर्ण करण्याचे फारच मनावर घेतलेले दिसते. पक्षाच्या मुख्यालयासमोर ‘प्रियांका लाओ, काँग्रेस बचाओ’चा नारा आत्तापासूनच सुरू झाल्याचे ऐकतो आहोत,’ अशाप्रकारच्या विनोदांनी सोशल मीडियावर बहार उडवून दिली आहे. मोदीलाट नाकारण्यापासून ते निवडणुकांमध्ये धुऊन निघालेल्या पक्षांपर्यंत अनेक घटनांवर लोकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून टीकाटिप्पणी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा