गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी तिसऱ्यांदा विराजमान झालेल्या आणि भाजपमध्ये पंतप्रधान पदासाठी शर्यतीत असलेल्या नरेंद्र मोदी यांचे देशभरात सत्कार व कार्यक्रम होत असताना मुंबईत मात्र त्याचा विजयानंतर सत्कार झालेला नाही. नितीन गडकरी यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी फेरनिवड होण्यामध्ये मोदींसह काही भाजपमधील ज्येष्ठ नेत्यांनी अडथळे आणल्याने मोदींचा मुंबईतील सत्कार रखडण्याची चिन्हे आहेत. मोदींनी घवघवीत यश संपादन केल्यावर प्रदेश व मुंबई भाजपकडून विजयोत्सव साजरा करण्यात आला. तेव्हा मोदी यांचा लवकरात लवकर मुंबईत सत्कार करण्याची घोषणा मुंबई अध्यक्ष राज पुरोहित व अन्य भाजप नेत्यांनी केली होती. मोदी हे भाजपचे पंतप्रधानपदाचे प्रमुख उमेदवार असल्याचे काही नेत्यांकडून जाहीर केले जात आहेत. तर स्वत: मोदी यांच्याकडूनही आपली प्रतिमा तयार करून घेण्याचे प्रयत्न होत आहेत. राष्ट्रीय राजकारणात उतरण्यासाठी देशभरात मोदी दौरे करणार असून नवी दिल्लीसह अनेक ठिकाणी त्यांचे कार्यक्रम व सत्कार होत आहेत. मोदी मुंबईत विविध कार्यक्रमांसाठी येतात. ते दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्यावर त्यांचा शिवाजी पार्कवर जाहीर सत्कार करण्यात आला होता. पण तिसऱ्यांदा मोठे यश मिळवूनही मुंबई किंवा महाराष्ट्र भाजपने त्यांचा सत्कार व सभा आयोजित केलेली नाही. गडकरी यांच्या अध्यक्षपदाच्या फेरनिवडीत मोदी यांनी अडथळे उभारल्याने गडकरी नाराज होतील. त्यामुळे पुढाकार कोणी घ्यायचा, ही अडचण असल्याचे समजते. मुंडे यांच्या गटातील नेत्यांनी सत्कारासाठी पुढाकार घेतला, तर त्यांनी गडकरी यांना डिवचण्यासाठी मुद्दाम सत्कार आयोजित केल्यासारखे होईल. त्यामुळे सध्या हे नेतेही थंड आहेत. मोदी आणि महाराष्ट्रातील भाजप नेत्यांचे चांगले संबंध असताना त्यांचा मुंबईत अजून सत्कार किंवा सभा का झाली नाही, असे विचारता यासंदर्भात दोन-तीन दिवसांत निर्णय घेतला जाईल, असे पुरोहित यांनी ‘लोकसत्ता’ ला सांगितले. तर प्रदेशाध्यक्षांची निवड झाल्यावर त्यांच्या व मोदींच्या एकत्रित सत्काराबाबत ठरविले जाईल, असे एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा