महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेला सोमवारपासून प्रारंभ होत आहे. मंडळातर्फे  यासाठीची संपूर्ण तयारी पूर्ण झाली असल्याचे सांगण्यात येत असले तरी अनेक शाळांतील विद्याथ्यार्ंना अद्यापही प्रवेशपत्रे मिळाली नाहीत.  शाळेत प्रवेशपत्रे न मिळाल्याने शिक्षण मंडळाकडे पालक आणि शिक्षकांनी धाव घेतली आहे.
बारावीप्रमाणेच दहावीच्या परीक्षा केंद्रांवर कॉपीचे प्रकार रोखण्यासाठी कडक बंदोबस्त ठेवण्यावर मंडळाने विशेष भर दिला असून प्रत्येक जिल्ह्य़ासाठी सात भरारी पथके आणि संवेदनशील केंद्रावर बैठक पथकाची व्यवस्था करण्यात आली आली आहे. नागपूर विभागीय मंडळात ७४४ परीक्षा केंद्रांवर सहा जिल्ह्य़ातील २ लाख ५ हजार ०१६ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. त्यात पुनर्परीक्षार्थी २८ हजार २०८ तर नियमित विद्यार्थी १ लाख ७६ हजार ८०८ आहेत. ४८ केंद्रे संवेदनशील घोषित करण्यात आली असून या केंद्रांवर विशेष बंदोबस्त लावण्यात आल्याची माहिती मंडळाचे नागपूर विभागीय सचिव अनिल पारधी यांनी दिली.
 नियमित आणि पुनर्परीक्षार्थी मिळून भंडाऱ्यातून २६ हजार ६६५, चंद्रपूरमधून ३६ हजार ९१७, नागपूरमधून ८० हजार ९५७, नागपूर ग्रामीण ३४ हजार ७७७, वध्र्यामधून २२ हजार ९८२, गडचिरोलीमधून १७ हजार ७३० तर गोंदियामधून २४ हजार ९८८ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. परीक्षा देणाऱ्यांमध्ये मुलांपेक्षा मुलींची संख्या जास्त आहे. विद्यार्थ्यांचा परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी मंडळाने काही योजना आखल्या आहेत. अपंग विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सवलतीसाठी अर्ज देणे आवश्यक आहे. दहावीच्या परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी नागपूर विभागीय मंडळात परीक्षा मंडळातर्फे विशेष भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. एकंदर ६० भरारी पथके राहणार असून त्यात मंडळाची चार पथके ही आकस्मिक पथके म्हणून परीक्षेच्या दिवसात काम पाहणार आहेत.
 न्यायालयाच्या आदेशानुसार अध्ययन अक्षम (डिस्लेक्सिया, डिसकॅलक्युलिया, डिसग्राफिया ) विद्याथ्यार्ंना गणित विषयांसाठी कॅलक्युलेटर वापरता येतील. परीक्षेदरम्यान मोबाईलचा वापर करण्यावर बंदी आणण्यात आली आहे. जे विद्यार्थी किंवा शिक्षक मोबाईल घेऊन त्याचा वापर करीत असतील तर त्यांच्यावर कडक कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.
परीक्षेच्या काळात होणारे गैरप्रकार बघता काही संवेदनशील केंद्रांवर व्हीडिओ चित्रण करण्याचा मंडळाचा प्रयत्न राहणार आहे. कॉपी पुरविणे किंवा विद्यार्थ्यांना कॉपीसाठी मदत करणाऱ्या शिक्षकांवर व संबंधित केंद्र अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.
हेल्पलाईन कार्यान्वित
 प्रवेशपत्र, वेळापत्रक, बैठक व्यवस्था आदींबाबतच्या शंकांचे निवारण करण्यासाठी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष ‘हेल्पलाईन’ कार्यान्वित केली आहे. नागपूर आणि अमरावती विभागीय मंडळाचे ‘हेल्पलाईन’चे क्रमांक पुढीलप्रमाणे – नागपूर- ०७१२- २५५३५०३, अमरावती- ०७२१- २६६२६०८.

आजारपणाच्या सबबीवर कारवाईचे इंजेक्शन! : परीक्षेचे काम टाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिक्षकांविरुद्ध कारवाई करण्याचा इशारा शिक्षण विभागाने दिला आहे. ‘साहेब माझी तब्येत चांगली नाही’, ‘मधुमेह-रक्तदाब वाढला, मला परीक्षेचे काम देऊ नका’ अशा सबबी सांगणाऱ्यांसाठी हा इशारा आहे. दरवर्षी विदर्भात मोठय़ा प्रमाणात कॉपीचे प्रकार आढळून येत असताना यावर्षी विदर्भात सध्या कॉपीमुक्त परीक्षेचे वारे वाहत आहे. कोणत्याही परिस्थितीत कॉपी नाही, असा निर्धारच शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. बारावी परीक्षेत त्याचा परिणाम दिसून आला आहे. अत्यंत शांततेत व शिस्तीत बारावीची परीक्षा सुरू झाली असून सोमवारपासून दहावीची परीक्षा सुरू होणार आहे. शिक्षकांनी पेपर तपासणीवर  बहिष्कार टाकला आहे. महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांनी बहिष्कार मागे घेतला असला तरी त्यांनी पेपरचे गठ्ठे उचलले नाहीत. त्यामुळे परीक्षांचे नियोजन करताना शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची दमछाक होत आहे. कॉपीमुक्तीमुळे केंद्रावर डोकेदुखी करून घेण्यापेक्षा या कामातून स्वत:ची सुटका करून घेण्यासाठी काही शिक्षक प्रयत्नशील आहेत. केंद्रप्रमुखाचे काम करण्यास काही शिक्षक अनुत्सुक असल्याचे सांगण्यात आले.
बारावीच्या परीक्षेत सुरू असलेल्या कारवाईच्या धसक्याने अनेक शिक्षक ‘आजारी असल्याचे’ कारण पुढे करून जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करीत असतील तर त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची तयारी शिक्षण विभागाने चालविली आहे.