‘राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा, प्रणाम आमुचा तुजला घ्यावा महाराष्ट्र देशा’ अशा शब्दांत राम गणेश गडकरी ऊर्फ गोविंदाग्रज यांनी ज्या महाराष्ट्राचे वर्णन केले आहे, त्या महाराष्ट्रातील दुर्गम गड-किल्ले आणि गडवाटा आता ई-बुक्समध्ये उपलब्ध झाल्या आहेत. काळाची पावले ओळखून मराठी साहित्य ई-स्वरूपातच प्रकाशित करणाऱ्या ई-साहित्य प्रतिष्ठानने ‘दुर्ग दुर्घट भारी’या उपक्रमाअंतर्गत गड-किल्ल्यांची माहिती संकलित केली आहे. सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे ही सर्व माहिती ई-मेलवर विनामूल्य उपलब्ध आहे.  
सध्याचा जमाना हा फेसबुक, भ्रमणध्वनी आणि इंटरनेटचा आहे. आजची युवा पिढी तसेच विद्यार्थी याचा जास्तीत जास्त वापर करत आहेत. गिरीभ्रमण आणि गिर्यारोहण या दोन क्षेत्रातही महाविद्यालयीन विद्यार्थी आणि युवकांची संख्या लक्षणीय आहे. या पिढीला जे आवडते ते त्यांना त्यांच्या आवडीच्या माध्यमातून देण्याच्या उद्देशाने ‘दुर्ग दुर्घट भारी’ हा ई-पुस्तक मालिकेचा उपक्रम हाती घेण्यात आला. ई-साहित्य प्रतिष्ठानच्या सुनील सामंत यांच्या पाठिंब्याने हा उपक्रम प्रत्यक्षात आला असून नचिकेत जोशी हे या या पुस्तक मालिकेचे मुख्य संपादक आहेत.     
या उपक्रमाअंतर्गत आत्तापर्यंत दहा पुस्तके प्रकाशित करण्यात आली असून त्यात रायगड, पेब, पन्हाळगड ते विशाळगड, सिंहगड, रायरेश्वर, केंजळगड, बिकटगड, माहुलीगड, भैरवगड, खांदेरी-उंदेरी हे जलदुर्ग,  या किल्ल्यांचा समावेश आहे. पुस्तकात किल्ल्याच्या माहितीबरोबरच छायाचित्रेही देण्यात आली आहेत. तसेच किल्ल्याचा इतिहास, भुगोल, किल्ल्यावर कसे जायचे, तेथे राहण्याची सोय, संबंधित किल्ल्याच्या भटकंतीबाबत संकेतस्थळ आणि ब्लॉगवर उपलब्ध असलेली माहिती, गिरिभ्रमण व गिर्यारोहणासाठी बाहेर पडताना घ्यावयाची काळजी, अशी सर्व माहिती ‘पीडीएफ’स्वरूपात प्रकाशित करण्यात येत आहे. सध्या दर महिन्याला एक किल्ला या प्रमाणे एका किल्ल्यावरील ई-पुस्तक तयार करण्यात येत आहे.
लवकरच गोरखगड ते सिद्धगड असे पुस्तक प्रकाशित होईल. महाराष्ट्रातील सुमारे साडेतीनशे किल्ल्यांची माहिती या उपक्रमाअंतर्गत देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे या उपक्रमातील एक सदस्या माधुरी नाईक यांनी सांगितले.  ‘दुर्ग दुर्घट भारी’साठी durgabhari@gmail.com  किंवा esahity.com येथे संपर्क साधावा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा