मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या, शनिवारी दिवसभर अतिवृष्टीग्रस्त विदर्भाच्या दौऱ्यावर येत असून वाशीम जिल्ह्य़ातील कारंजा आणि चंद्रपूरमधील पूरग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. लाखो हेक्टरवरील पिकहानी, घरादारांचे नुकसान आणि बळींचा आकडा वाढल्याच्या पाश्र्वभूमीवर विधिमंडळात विदर्भातील अतिवृष्टीची चर्चा उपस्थित झाल्यानंतर सर्व लोकप्रतिनिधींनी विदर्भात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा नागपूर आणि अमरावती विभागातील दोनच जिल्ह्य़ांचा दौरा अत्यंत महत्त्वाचा ठरणार असून पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देणारी एखादी घोषणा होईल, अशा आशेवर बळीराजा आहे.
मुख्यमंत्र्यांचे उद्या सकाळी ९.३० वाजता अमरावतीला आगमन होणार असून त्यानंतर ते सकाळी १०.३० ते दुपारी १२ दरम्यान अमरावती विभागातील वाशीम जिल्ह्य़ात कारंजा येथे जाणार असून पूरग्रस्त भागाच्या पाहणीनंतर अधिकाऱ्यांशी चर्चा करतील. दुपारी दीडच्या सुमारास कारंजा येथून मोटारने अमरावतीला येतील आणि अमरावती विमानतळावरून विमानाने थेट चंद्रपूरला त्यांचे आगमन होईल.
चंद्रपूर शहराची पावसाने पार वाताहत केली असून त्यानुसार त्यांचा दुपारी २.३० ते ४ यादरम्यान पाहणी दौरा होणार असल्याचे सांगण्यात आले. यानंतर ते विमानाने नागपूरला येणार असून थेट नागपूर विभागीय कार्यालयात जातील. सायंकाळी ५ वाजता विभागीय कार्यालयातील आढावा बैठकीनंतर ते रात्री ७.३० वाजता मुंबईला विमानाने रवाना होतील. मुख्यमंत्र्यांसोबत पूर्नवसनमंत्री पतंगराव कदम, राष्ट्रवादीचे संपर्क मंत्री सचिन अहीर, या जिल्हय़ाचे पालकमंत्री संजय देवतळे सोबत राहतील.
अतिपावसाने विदर्भात लाखो हेक्टरमधील पिके धोक्यात आली असून काही भागात तर शेतजमीनच खरडून गेली आहे. विदर्भातील तिन्ही प्रमुख पिके कापूस, सोयाबीन आमि धान हातचे जाण्यासारखी परिस्थिती उद्भवली आहे. आतापर्यंत पावसाने अमरावती विभागात ३३ तर नागपूर विभागात ३७ जणांचे बळी घेतले आहेत.
अमरावती विभागात सरासरीच्या १७५ टक्के पावसाची नोंद झाली आहे. काही तालुक्यांनी तर वार्षिक सरासरीही ओलांडली आहे. नागपूर विभागात अडीच लाख हेक्टर तर पश्चिम विदर्भात ६० हजार हेक्टरवरील पिकांची नासाडी झाली आहे. यवतमाळ जिल्ह्य़ात सर्वाधिक ३६ हजार हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले आहे.
पाणलोट क्षेत्रातील दमदार पावसामुळे मुबलक जलसाठा झाला असला, तरी धरणांमधून सोडण्यात येणाऱ्या जादा पाण्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे. अमरावती विभागातील सर्वात मोठय़ा अप्पर वर्धा, अरुणावती धरणाचे ७ दरवाजे, काटेपूर्णा आणि वान प्रकल्पाचे ४ दरवाजे उघडण्यात आले आहे.
नागपूर विभागात सर्वाधिक पावसाची सरासरी नोंद गडचिरोली जिल्ह्य़ामध्ये १११०.४८ मि.मी. एवढी झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्य़ातील चंद्रपूर, गोंडपिपरी, भद्रावती व जिवती हे चार तालुके अतिवृष्टीग्रस्त ठरले आहेत. पावसाची सरासरी ५१७.३७ मि.मी. असताना आतापर्यंत तब्बल ९२८.८८ मि.मी. पाऊस झाला आहे. नागपूर विभागातील १९ प्रकल्पांपैकी १०, मध्य प्रकल्पांपैकी ४० पैकी २३ प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याने शेतांचे प्रचंड नुकसान झाले आहे.