लैंगिक छळ करून महिला पोलिसाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी करमाड पोलीस ठाण्याचा सहायक निरीक्षक शेख युसूफ शेख अब्दुल नबी यास पोलिसांनी सोमवारी अटक केली. करमाड पोलीस ठाण्यांतर्गत महिला पोलीस हवालदार संध्या मोरे हिने रविवारी शेख युसूफच्या छळास कंटाळून आत्महत्या केली. सोमवारी संध्याचे वडील धर्मा नत्थू मोरे यांनी याबाबत दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा नोंदवून शेख युसूफ यास अटक करण्यात आली. माझ्या मुलीला न्याय मिळवून द्या, अशी मागणी धर्मा मोरे यांनी केली. या प्रकरणी आणखी एका हवालदारावर संशय असून, तो महिला कर्मचाऱ्यांना त्रास देत होता काय, याची तपासणी केली जात आहे. सहायक निरीक्षक शेख महिला हवालदार संध्या मोरे हीस वेगवेगळय़ा प्रकारे त्रास देत होता. पोलीस ठाण्यातील बारनिशी लिहिणे व हजेरी मेजर अशी जबाबदारी संध्याकडे दिली होती. प्रत्येक कामासाठी तिला तो जाणीवपूर्वक बोलावत असे. दूरध्वनीवरूनही असभ्य बोलण्याचा प्रयत्न त्याने काही वेळा केला होता. सहायक निरीक्षकाची ही वर्तणूक संध्याने पोलीस उपअधीक्षक पल्लवी बर्गे यांच्या निदर्शनास आणली होती. त्यांनी शेख यास लेखी समज दिली होती.
करमाड पोलीस ठाण्यांतर्गत सहा महिला कर्मचारी काम करतात. त्यातील संध्याने आत्महत्या केल्यानंतर पाच महिला कर्मचाऱ्यांचे जबाब सोमवारी घेण्यात आले. शेख युसूफ महिला कर्मचाऱ्यांना त्रास देत असल्याची तक्रार तीन कर्मचाऱ्यांनी केली असल्याचे बर्गे यांनी सांगितले. संध्या दररोज दैनंदिनी लिहीत असे. घडलेल्या सगळय़ा प्रकाराची माहिती तिने एका दैनंदिनीत नोंदविली असून ती वडिलांना द्यावी, असेही तिने लिहिलेले आहे. १५ ऑगस्टच्या दरम्यान अधिकाऱ्याच्या त्रासाबाबतची माहिती तिने वडिलांकडे केली होती.
धर्मा मोरे हे धुळे येथे कृषी विभागात कर्मचारी आहेत. त्यांनी पोलीस ठाण्यांतर्गत प्रतिनियुक्ती मिळू शकते काय, याची विचारणाही केली होती. तथापि, शिस्तीचा अधिकारी नव्याने रुजू झाल्याने रजाही मिळणार नाही व दुसरीकडे बदलीही होणार नाही, असे संध्याने वडिलांना सांगितले होते. परिस्थितीचा अंदाज घेता यावा यासाठी ते संध्याकडे करमाड येथे आले होते. मात्र, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शेख युसूफ यास लेखी पत्र दिले असल्याने आता प्रकरण काहीसे निवळल्याचे संध्याने वडिलांना सांगितले. ते धुळय़ाकडे परतताना संध्याने आत्महत्या केल्याचा निरोप त्यांना मिळाला.
सोमवारी, या प्रकरणी शेख युसूफवर गुन्हा दाखल झाला असला, तरी पूर्वी तक्रार करूनही चौकशी अहवाल का तयार झाला नाही, याची चर्चा ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयात केली जात आहे. या अनुषंगाने बर्गे यांना विचारले असता त्या म्हणाल्या, की लेखी स्वरूपात एकही तक्रार आली नव्हती. पण महिला पोलीस कर्मचाऱ्यास अधिकारी त्रास देत असल्याची माहिती मिळाल्यानंतर शेख यांना बोलावून घेऊन महिला कर्मचाऱ्यांशी कशी वर्तणूक ठेवावी याविषयी समज दिल्याचे बर्गे यांनी सांगितले. लेखी स्वरूपात शेख युसूफ यास ज्ञापनही देण्यात आले होते. महिला कर्मचाऱ्यांना त्रास देण्यात एका हवालदाराचाही हात असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, त्याचा या प्रकरणात सहभाग किती, हे तपासानंतरच उघड होईल, असेही पोलीस अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा