कामगारांचा गौरव, कामगार मेळावा, व्याख्यानमाला, गुणवंतांचा सत्कार, थोर दिवंगत नेत्यांचे स्मरण अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून शहर व जिल्ह्यात महाराष्ट्र व कामगार दिन विविध संस्था, संघटनांच्या वतीने साजरा करण्यात आला.
आयटक कामगार केंद्र
आयटक कामगार केंद्रात कामगार व महाराष्ट्र दिन ज्येष्ठ कवी कैलास पगारे यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा झाला. या वेळी त्यांनी कामगार वर्गाचे प्रश्न तीव्र होत असून शिक्षण, आरोग्य, निवारा या सुविधा सर्वसामान्यांना मिळणे कठीण होत असल्याचा मुद्दा मांडला. कामगार मोठय़ा प्रमाणावर सामाजिक सुरक्षितेपासून वंचित आहेत. सरकारचे धोरण कामगार वर्गाच्या विरोधात आहे. यासाठी संपूर्ण कामगार वर्गाने संघटित होऊन लढा उभारावा, असे आवाहनही त्यांनी केले. या वेळी ज्येष्ठ कामगार कर्मचारी नेते राम गायटे यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. कवी कैलास पगारे, एसटी निवृत्त कर्मचारी संघटनेचे सुधाकर गुजराथी, आयुर्विमा कर्मचारी नेते चंद्रशेखर मोघे, रेशन दुकानदार संघटनेचे दिलीप तुपे, शिवाजी लांडे, भाकप शहर सचिव दत्तू तुपे, आम्रपाली अहिरे, बँक कर्मचारी नेते दिलीप कुटे, लाल बावटा शेतमजूर संघटनेच्या सरचिटणीस सुनीता शर्मा आदी मान्यवर उपस्थित होते. गायटे यांनी कामगार चळवळ बदलत असून महिला संघर्ष करीत असल्याचे सांगितले. असंघटित कामगार, मोलकरीण यांनी अधिक संघटित होऊन लढा उभारण्याचे आवाहन केले. याप्रसंगी घरकामगार मोलकरीण कल्याणकारी मंडळातर्फे शासकीय ओळखपत्रांचे मोलकरींना वाटप करण्यात आले. प्रास्ताविक आयटकचे राज्य सचिव राजू देसले यांनी केले. सूत्रसंचालन मोलकरीण संघटनेच्या जिल्हाध्यक्षा संगीता उदमले यांनी केले. आभार अॅड. राजपाल शिंदे यांनी मानले. या वेळी कामगारविषयक कवितांचे वाचन झाले.
हृदयरोग व मधुमेह निदान शिबीर
नाशिक येथील श्री साईबाबा हार्ट इन्स्टिटय़ूट आणि रिसर्च सेंटर, सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन (सिटू), डॉ. कराड हॉस्पिटल, मेडिकल असोसिएशन नाशिक यांच्या वतीने कामगार दिनी हृदयरोग व मधुमेह निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन सातपूर प्रभाग समिती सभापती विलास शिंदे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी डॉ. डी. एल. कराड, डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, डॉ. अभयसिंग वालिया, नगरसेवक सलीम शेख आदी उपस्थित होते.
शिबिरात ईसीजी, रक्तातील साखर, रक्तदाब या तपासण्या करण्यात आल्या. रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांनी मार्गदर्शन केले. सुमारे १०० कामगारांनी तपासण्या केल्या.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा