मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र मिळवून देणाऱ्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा आणि त्यात हौतात्म्य पत्करणाऱ्या १०६ जणांचा आज केवळ राजकीय नेतेच नव्हे तर मुंबईकरांनाही विसर पडला आहे. महाराष्ट्र दिन, १ मे हा केवळ सार्वजनिक सुट्टीचा दिवस बनला आहे. मात्र आता मानसिकता बदलण्याची वेळ आली आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या इतिहासाच्या खाणाखुणा मुंबईत आजही आहेत. या इतिहासाला उजाळा देत त्याची भावी पिढीला माहिती देण्याची गरज आहे. मात्र नेमका त्याचाच विसर आज मुंबईकरांना पडला आहे. हुतात्मा स्मारक, ‘संयुक्त महाराष्ट्र कला दालन’ आपल्या कच्च्याबच्च्यांना दाखवून या इतिहासाची उजळणी पालकांनी केल्यास ती खरी हुतात्म्यांना श्रद्धांजली ठरेल.
ब्रिटिशांच्या काळात सात बेटांची असलेली आणि नंतर एक झालेल्या या मुंबई मायानगरीत सहज भटकायचे म्हटले तर जुन्या मुंबई शहराच्या खाणाखुणा वागवणारी कित्येक ठिकाणे पहायला मिळतील. पण, ‘महाराष्ट्र दिना’च्या निमित्ताने याच मुंबईत संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीची रुजलेली बीजे, १०६ हुतात्म्यांच्या बलिदानातून आकाराला आलेले हे मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्य असा खूप मोठा इतिहास आणि त्याच्या खाणाखुणा या मुंबई शहरात आजही आहेत. ‘महाराष्ट्र दिन’ म्हणजे सुट्टीचा एक दिवस अशी व्याख्या न करता यानिमित्ताने बच्चेकंपनीला या ऐतिहासिक ठिकाणांची सफर घडवून त्यांना त्यांच्या राज्याची खरी ओळख करून देता येईल.
मुंबईच्या फोर्ट परिसरातील संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांचे स्मारक हे या महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीतील एक महत्त्वाचे पान आहे. हा परिसर पहिल्यांदा फ्लोरा फाऊंटन म्हणून प्रसिध्द होता. मात्र, मुंबई शहर गुजरात राज्यात जाऊ नये यासाठी मुंबईकर याच परिसरात ठाण मांडून बसले होते. आंदोलनकर्त्यांवर बेछूट गोळीबार झाला आणि त्यात १०६ जणांनी बलिदान दिले. या हुतात्म्यांना सलाम करणारे हे स्मारक १९६५ मध्ये उभारण्यात आले. या स्मारकावर १०६ हुतात्म्यांची नावे कोरण्यात आली आहेत. मात्र, आपम ज्या राज्यात राहतो त्याच्या निर्मितीचा संघर्षमय इतिहास आजही अनेकांना माहीत नाही. ‘महाराष्ट्र दिना’चा विचार करताना याच ठिकाणापासून लहान मुलांना इतिहासाची ओळख करून देण्यास सुरूवात केली पाहिजे. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या पुढाकाराने उभ्या राहिलेल्या दादरच्या शिवाजी पार्क परिसरातीस उद्यान गणेशासमोरचे ‘संयुक्त महाराष्ट्र कला दालना’त मोठमोठी छायाचित्रे आणि अन्य दस्तावेजाद्वारे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा इतिहास जिवंत झाला आहे. या दालनाला लहान मुलांनीच नव्हे तर प्रत्येकाने भेट दिली पाहिजे. ज्या मुंबईत आणि महाराष्ट्रात आज आपण अभिमानाने स्वातंत्र्य उपभोगत जगतो आहोत. त्याचे श्रेय हे या चळवळीला आणि त्यातून घडलेल्या बदलांना आहे. केवळ इतिहासच नव्हे तर आपण कोण आहोत?, याची खरी ओळख करून देणारी ही जागा लहान मुलांना दाखवायलाच हवी अशी आहे.
याशिवाय, संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीपासून ते आजघडीपर्यंत या राज्याचा कारभार ज्या परिसरातून, ज्या वास्तूतून चालतो त्या वास्तूंची ओळखही तितकीच महत्त्वाची आहे. सुट्टय़ांच्या काळात मुलांना ‘पिझ्झा हट’सारख्या ठिकाणी नेण्यास उत्सूक असणारे पालक आपल्याच वास्तूची, परंपरेची ओळख लहान मुलांना क रून द्यायला विसरतात. किती पालक मुलांना घेऊन अशा वास्तूंना भेटी देतात?, हा खरा प्रश्न आहे. मंत्रालयाची भव्य इमारत, त्याच्यासमोर असलेली प्रशासकीय इमारत, पाठीमागे असलेले विधानभवन हे या राज्याचे सत्ताकेंद्र आहे. त्याचीही ओळख मुलांना करून देणे गरजेचे आहे. याच परिसराच्या अलीकडे छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय आहे. या वस्तूसंग्रहालयात केवळ महाराष्ट्राचाच नव्हे, तर ५ हजार वर्षांपूर्वीच्या संस्कृतीचीही ओळख करून घेता येते. चार मजली भव्य वास्तू असलेले हे संग्रहालय बारकाईने पहायचे म्हटले तरी एक दिवस पूर्ण लागतो. याशिवाय, नेहरू सेंटरमध्ये कायमस्वरूपी असलेल्या ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ या प्रदर्शनातही महाराष्ट्राचा इतिहास, परंपरा अंतर्भूत करण्यात आले आहेत.
चला शोधूया, महाराष्ट्र माझा?
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र मिळवून देणाऱ्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा आणि त्यात हौतात्म्य पत्करणाऱ्या १०६ जणांचा आज केवळ राजकीय नेतेच नव्हे तर मुंबईकरांनाही विसर पडला आहे.
First published on: 01-05-2015 at 12:08 IST
मराठीतील सर्व वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra day only become public holiday