अपंगांना उच्च शिक्षणासह रोजगाराची संधी उपलब्ध करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच प्रयोगशील राज्य ठरले आहे, असे प्रतिपादन राज्याचे अपंग कल्याण आयुक्त बाजीराव जाधव यांनी केले.
जीवन विकास प्रतिष्ठान व जिल्हा विधिसेवा प्राधिकरण यांच्या वतीने आयोजित पालक मेळाव्यात जाधव बोलत होते. जिल्हा व सत्र न्यायाधीश के. पी. जोशी, न्यायाधीश एम. जी. चौधरी, बी. डी. कुलकर्णी, वि. खु. देशपांडे, संस्थाध्यक्ष जयसिंहराव देशमुख, सचिव रामानुज रांदड उपस्थित होते. गेल्या ३२ वर्षांत जीवन विकास प्रतिष्ठानने जागतिक कीर्तीचे अपंग खेळाडू दिले. अनेक गुणवंत विद्यार्थ्यांना संधी दिली. २५० मतिमंद मुलांचे पुनर्वसन केले, यात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विलासराव देशमुख यांचे अनमोल योगदान असल्याचे रांदड यांनी प्रास्ताविकात सांगितले.
पालक मेळाव्याप्रसंगी कर्णबधिर गुणवंत विद्यार्थी, विशेष पदविकाप्राप्त गुणवंत अध्यापक, उल्लेखनीय पुनर्वसित मतिमंद मुले व त्यांचे पालक यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मतिमंद मुलांमध्ये आढळणाऱ्या लक्षणांसाठी उपचार गरजेचे असल्याचे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. मििलद पोतदार यांनी सांगितले. अपंगांसाठी आपुलकीच्या नात्याने समर्पित भावनेने काम करणारी राज्यातील सर्वोत्कृष्ट संस्था म्हणून जीवन विकास प्रतिष्ठानचा उल्लेख करावा लागेल, असे गौरवोद्गार जिल्हा सत्र न्यायाधीश जोशी यांनी काढले.
संस्थेचे उपाध्यक्ष कांताप्रसाद राठी यांनी आपल्या अमृतमहोत्सवीवर्षांनिमित्त सौर योजनेसाठी एक लाख रुपये देणगी जाहीर केली. सुनीता कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. अभय शहा यांनी आभार मानले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा