महाराष्ट्रातील दुर्गसंपदा मोठी असून विस्तीर्ण सह्य़ाद्री पर्वतरांगांमध्ये साडेतीनशेहून अधिक किल्ले पसरले आहेत. मात्र या किल्ल्यांमधील अनेक किल्ल्यांविषयी अजूनही सर्वसामान्यांना माहिती नाही. या किल्ल्यांची माहिती, तेथे पोहोचण्याचे मार्ग, किल्ल्यांचे नकाशे अशी माहिती आता मोबाइल अॅप्लिकेशनवर उपलब्ध होणार आहे. डोंबिवलीच्या श्रीपाद भोसले यांनी दुर्गसह्य़ाद्री या मोबाइल अॅप्लिकेशनच्या माध्यमातून महाराष्ट्रातील ७० किल्ल्यांचे नकाशे उपलब्ध केले आहेत. गड-किल्ले भ्रमंतीची हौस असणाऱ्या तरुणांना आता या अॅप्सच्या मदतीने सहजपणे किल्लेसफर करण्याची सोय उपलब्ध होणार आहे.
महाराष्ट्रातील किल्ल्यांचे मार्ग, नकाशांची निर्मिती आणि किल्ल्यांच्या इतिहास संकलनामध्ये भारतीयांपेक्षा ब्रिटिशांचे मोठे योगदान आहे असे दिसून येते. त्या वेळी त्यांनी संकलित केलेली माहिती आजही आपल्याकडे संदर्भासाठी वापरली जाते. मात्र माहिती संकलित करून अनेक वर्षे उलटली असून या माहितीमध्ये देखील मोठे बदल घडून आले आहेत. गडकिल्ल्यांच्या परिसरात नवी शहरे वेगाने विकसित होत आहेत. त्यामुळे शहरापासूनचे किल्ल्यापर्यंतचे अंतर याविषयीचे सद्यस्थितीचे नकाशे, माहिती जुन्या पुस्तकांमधून मिळणे कठीण बनले आहे. डोंबिवलीत वकिलीचा व्यवसाय करणारे श्रीपाद भोसले यांना गडदुर्ग भ्रमंतीचा ध्यास कॉलेजच्या वयात लागला. भटकंती करण्यासाठी त्यांनी स्वराज्य प्रतिष्ठान या संस्थेची स्थापना करून त्या माध्यमातून त्यांनी दुर्गभ्रमंतीला सुरुवात केली.
एखाद्या किल्ल्यावर जाण्यासाठी, तेथील माहिती जमवण्यासाठी अनेक पुस्तके त्यांना धुंडाळावी लागली. मात्र त्यातदेखील मिळणारी माहिती त्रोटक होती. हीच उणीव लक्षात आल्यानंतर भोसले यांनी राज्यातील सुमारे ७० किल्ल्यांच्या नकाशांचे रेखांकन केले. २००५ साली त्यांनी या नकाशांचे एकत्रितपणे ‘स्वर सह्य़ाद्रीच्या वाटा’ नावाचे एक पॉकेटबुक तयार केले. या पुस्तकात एकूण ५० नकाशे असून त्याच्यासोबत त्या किल्ल्याची ऐतिहासिक महत्त्व सांगणारी एक कवितादेखील होती.
वेगाने विस्तारणाऱ्या डिजिटल युगामध्ये हे पॉकेटबुक मोबाइलवर यावे यासाठी भोसले यांनी दोन महिन्यांपूर्वी प्रयत्न सुरू केला. अॅप्लिकेशन बनवणाऱ्या मित्रांची मदत घेत त्यांनी ‘दुर्गसह्य़ाद्री’ हे अॅप्स विकसित केले. संस्थेच्या वतीने ४ ते ६ ऑक्टोबर दरम्यान डोंबिवलीच्या आनंद बालभवनामध्ये गड-किल्ल्यांचे छायाचित्र प्रदर्शन भरविण्यात येत असून प्रदर्शनाच्या काळात हे अॅन्ड्रॉइड अॅप्लिकेशन सुरू करण्यात येणार आहे.
दुर्गभ्रमंती करणाऱ्या मंडळींना केवळ दीड मिनिटांमध्ये हे अॅप्लिकेशन डाऊनलोड करून घेता येणार आहे. शिवाय अत्यंत जलदगतीने राज्यातील किल्ले-दुर्गप्रेमींना तात्काळ पाहता येईल. भविष्यात हे अॅप्लिकेशन गुगल नकाशाला जोडून आपले ठिकाण आणि किल्ल्याचे अंतरदेखील कळू शकणार आहे. ६ ऑक्टोबरनंतर हे अॅप्लिकेशन गुगल प्लेमधून नागरिकांना विनामूल्य डाऊनलोड करून घेता येईल, अशी माहिती श्रीपाद भोसले यांनी दिली.
महाराष्ट्राची दुर्गसंपदा आता अॅण्ड्रॉईड अॅप्सवर!
महाराष्ट्रातील दुर्गसंपदा मोठी असून विस्तीर्ण सह्य़ाद्री पर्वतरांगांमध्ये साडेतीनशेहून अधिक किल्ले पसरले आहेत.
First published on: 01-10-2013 at 07:46 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra fort property now on fort