कोणताही परवाना नाही..प्रशिक्षित सहयोगी नाहीत..वैद्यकीय अधिकारी आणि पुरेशी वैद्यकीय साधनसामग्रीही नाही. या स्थितीत दिवाळी वा उन्हाळी सुटीच्या काळात गिर्यारोहण, गिरीभ्रमण आदी साहसी क्रीडा मोहिमांचे आयोजन करून प्रशिक्षणार्थीचा जीव धोक्यात घालणाऱ्या संस्था व संघटनांना चाप लावण्याची प्रक्रिया शासनाने सुरू केली आहे. साहसी क्रीडा मोहीम, कॅम्प वा सहली आयोजित करणाऱ्या संस्थांना आता नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले असून त्यांच्यासाठी खास नियमावली तयार करण्यात आली आहे. नोंदणी न करता कोणत्याही संस्थेने साहसी क्रीडा मोहिमांचे आयोजन केल्यास संबंधितांना फौजदारी कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
सुटीच्या कालावधीत प्रशिक्षण शिबिरांचा जसा सुकाळ असतो, तसाच वेगवेगळ्या साहसी क्रीडा मोहिमांना भरते आलेले असते. नाशिकसह राज्यातील इतर शहरे त्यास अपवाद नाहीत. कोणताही परवाना नसलेल्या अनेक संस्था गिर्यारोहण व तत्सम मोहिमांचे आयोजन करतात. या संस्थांकडे या क्षेत्रातील प्रशिक्षित सहयोगी नसतात. मोहिमेत वैद्यकीय अधिकारी सोबत असेल याची शाश्वती नसते. वैद्यकीय सामग्रीही पुरेशी नसते. या क्षेत्रातील अनेक संस्था अप्रशिक्षित आहेत. अशाच एका संस्थेसोबत हिमालयात गिर्यारोहणाला गेलेल्या एका युवकाचा श्वसनाचा त्रास झाल्यामुळे मृत्यू झाला. स्थानिक पातळीवर गिर्यारोहणावेळी वेगवेगळ्या कारणाने काही जणांना प्राणास मुकावे लागण्याच्या घटना घडल्या आहेत. या पाश्र्वभूमीवर, उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार नोंदणीकृत नसलेल्या संस्थांना आळा घालण्यासोबत प्रशिक्षणार्थीच्या सुरक्षिततेसाठी नियमावली तयार करण्यात आली आहे. नोंदणी नसलेल्या, अप्रशिक्षित संस्था व व्यक्तींनी काढलेल्या मोहिमांमुळे एखाद्याचे प्राण संकटात सापडतात. उपरोक्त संस्थांची पुरेशी माहिती उपलब्ध नसल्याने क्रीडा विभागास नियंत्रण ठेवणे अवघड ठरते. प्रशिक्षणार्थीना या मोहिमांतील धोक्याची जाणीव नसते. या मोहिमांदरम्यान आपत्तीजनक स्थिती ओढवल्यास वा अपघात घडल्यास जिवावर बेतू शकते. यामुळे नाशिकसह राज्यात या स्वरूपाच्या मोहिमा काढणाऱ्यांसाठी नियमावली तयार करण्यात आली आहे. गिर्यारोहण, पर्वतारोहण, स्किईंग, स्नो बोर्डिग, पॅरासेलिंग, हॅगग्लायडिंग, पॅराग्लायडिंग, जलक्रीडा आदी साहसी क्रीडा प्रकारांबाबत प्रशिक्षण व मोहिमा राबविणाऱ्या सर्व व्यक्ती व संस्थांना जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीकडे नोंदणी करणे क्रमप्राप्त ठरणार आहे. नोंदणीवेळी संबंधितांकडून कर्मचारी, प्रशिक्षक, मार्गदर्शक यांची पात्रता आणि साधनसामग्री यांची माहिती घेतली जाईल. साहसी मोहिमांचे आयोजन करणाऱ्यांनी प्रशिक्षणार्थीना वैयक्तिक बचाव व संरक्षण साहित्य दिली असल्याचे प्रमाणित करावे लागेल. मोहिमांचा कालावधी एक दिवसापेक्षा अधिक असल्यास शिजविलेल्या अन्नासाठी सोईसुविधा नसल्यास ते तयार करण्यासाठी लागणारे साहित्य सोबत घेऊन जावे लागेल. या क्रीडा प्रकाराचे नेतृत्व करणारी व्यक्ती प्रमाणित प्रथमोपचार साहाय्य असणे आवश्यक आहे. तसे नसल्यास मोहिमेत असे प्रमाणपत्र असणारी व्यक्ती गटासोबत ठेवणे आयोजकांची जबाबदारी आहे. आणीबाणीप्रसंगी संपर्कासाठी मोहिमेत सहभागी होणाऱ्यांची नांव, पत्ता, दूरध्वनी यांची यादी तयार करणे तसेच वैद्यकीय अधिकारी नियुक्त करणे आवश्यक आहे. वैद्यकीय अधिकारी सोबत नेणे शक्य नसल्यास सहभागी झालेल्यांना उद्भवणाऱ्या धोक्यांची पूर्वकल्पना देणे आवश्यक आहे. आयोजकांना धोके व अडचणींची सत्य माहिती देऊन मोहिमांचे खरे स्वरूप सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला निदर्शनास आणून द्यावे लागेल. या शिवाय वेगवेगळ्या साहसी क्रीडा प्रकारानुसार काही निकष निश्चित करण्यात आले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नियमावलीतील ठळक मुद्दे
* १५ मीटर अथवा त्यापेक्षा अधिक उंचीच्या गिर्यारोहण मोहिमांसाठी १६ वर्षांखालील विद्यार्थ्यांना सहभागी करण्यास प्रतिबंध.
* ३०० मीटरपेक्षा अधिक उंचीवर आयोजिलेल्या साहसी मोहिमेत सहभागी होणाऱ्या प्रत्येकाचे तंदुरुस्ती प्रमाणपत्र घेणे आवश्यक.
* मोहिमेच्या कालावधीसाठी प्रत्येक सहभागीला विमा संरक्षण
* ज्या ठिकाणी अशी मोहीम राबविली जाईल, त्या राज्यातील सक्षम प्राधिकाऱ्याची परवानगी घेणे बंधनकारक.

मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra government order to register dangerous sports like hiking tracking