नियोजन आयोगाने साखळी बंधाऱ्यांसाठी देऊ केलेल्या ५०० कोटींच्या निधीतून राज्यात ठिकठिकाणी बंधारे बांधण्याचे काम हाती घेण्यात येईल, तसेच साखळी बंधाऱ्यासाठी आणखी २ हजार कोटींची मागणीही केल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार बैठकीत सांगितले. जलसंधारणाच्या कामासाठी सातारा जिल्ह्यास ८ कोटी रुपये देण्यात येणार असून, चालू पावसाळय़ात १ कोटी झाडे लावावीत तसेच मनरेगातून शंभर कोटींची कामे हाती घ्यावीत, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले असल्याचेही या वेळी सांगितले.  
सर्वसामान्यांच्या अडीअडचणी व काँग्रेस कार्यकर्त्यांशी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांनी आमनेसामने संवाद साधला. दिवसभरातील गाठीभेटी, राजकीय खलबते अन् आढावा बैठकांनंतर सायंकाळी त्यांनी पत्रकारांशी दिलखुलास संवाद साधला.
चव्हाण म्हणाले, की सकाळपासून दुष्काळी कामांचा आढावा घेतला. जिल्ह्यातील ५१ कामांची यादी माझ्याकडे आहे. त्यात कराड व पाटण तालुक्यातील कामांचा प्राधान्याने आढावा घेतला आहे. पुढच्या टप्प्यात साताऱ्यासह अन्य भागाचा आढावा घेण्याचे नियोजन आहे. राज्यातील १५ जिल्ह्यांमध्ये भीषण दुष्काळ होता. तो सावरण्यासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी, अधिकारी व त्या भागातील जनतेचा समन्वय मोलाचा ठरला. दुष्काळ दूर होत नाही तोपर्यंत प्रत्येक मंगळवारी आढावा बैठक घेऊन त्याचा सतत पाठपुरावा केल्यामुळे बहुतांश प्रश्न मार्गी लागले. दुष्काळात नऊ लाख ८० हजार जनावरांना सांभाळण्यात आले. साडेपाच हजार टँकरद्वारे ११ हजार गावांना पाणी देण्यात आले. त्यासाठी २ हजार ३०० कोटींचा खर्च झाला. याशिवाय २ हजार कोटी रुपये फळबागांसाठी देण्याचे नियोजन आहे. ठिकठिकाणी सिमेंट बंधारे बांधण्यात आले. साखळी सिमेंट बंधाऱ्यांचा पहिल्याच पावसात निश्चित स्वरूपात फायदा झाला. जलाशयातील गाळ काढण्याचे काम शासनाने हाती घेतले. त्यामुळे पहिल्याच पावसात जलाशय तुडुंब भरल्याचेही दिसून येत आहे. १५ जिल्ह्यांत बांधलेले १ हजार ४०० बंधारे लोकार्पण करण्यात आले. पक्षभेद विसरून एकजुटीने हे काम झाले. सिमेंट बंधाऱ्यांचे काम ज्या पद्धतीने झाले आहे तीच पद्धत कायमस्वरूपी अवलंबल्यास चारा, टँकरचा प्रश्न निकाली निघू शकतो. त्यासाठी ६० हजार कोटींचा कार्यक्रम हाती घेणार आहोत. त्यातून राज्यातील सर्व उपसा जलसिंचन योजनांच्या कामांना गती देण्याचा शासनाचा विचार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.  
जलसंधारणाच्या कामावर जोर देऊन भविष्यात टंचाईसदृश स्थिती नाहीशी करण्याचा आमचा निर्धार आहे. नियोजन आयोगाने साखळी पध्दतीचे बंधाऱ्यांसाठी ५०० कोटी रूपये दिले आहेत. त्यातून राज्यातील विविध ठिकाणी बंधारे बांधण्याचे काम हाती घेण्यात येईल. त्यात जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांच्या फंडातून ८ कोटींची कामे कोरेगाव, फलटण व खंडाळा तालुक्यांत करण्याचा विचार आहे. तर नियोजन आयोगाकडून येणाऱ्या ५०० कोटींतून मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात प्रामुख्याने कामांचे नियोजन आहे. तीन वर्षांत जलसंधारणासह जलसिंचनाची अनेक कामे हाती घेणार आहोत. पुढच्या वर्षी पाऊस झाला नाही तरी दुष्काळ येणार नाही अशी स्थिती होईल. अडवाणींच्या राजीनाम्यावर ते म्हणाले, एनडीए हा अनेक घटकपक्षांतून तयार झाला आहे. तर भाजपचे स्वतंत्र अस्तित्व आहे. त्यात अडवाणींनी दिलेला राजीनामा हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. मात्र, भाजप सध्या त्यांचा लीडर म्हणून नरेंद्र मोदी यांनाच पुढे आणू पाहात आहे, हे नक्की!
नक्षलवादाच्या प्रश्नावर ते म्हणाले, त्या भागात राहणारे नागरिक भारताचे नागरिक आहेत. त्यांना कायदा व सुव्यवस्था देण्याचे काम सरकारचेच आहे. त्यामुळे खचून न जाता त्यांचा मुकाबला करण्याची गरज आहे. राज्यात नक्षलवाद जेथे आहे त्याचा सर्वाधिक भाग वनक्षेत्राच्या हद्दीत येतो. त्यांच्या परवानगी व अन्य कागदोपत्री पूर्ततेस विलंब होत असल्याने तेथे विकास करणे कठीण बनले आहे.
सातारा जिल्ह्यात कराड उत्तरसह खंडाळा तालुक्यातील केसुर्डे व माण तालुक्यात औद्यागिक वसाहती सुरू करण्याची कार्यवाही लवकरच होईल, असे जाहीर करून मुख्यमंत्री म्हणाले, त्सुनामीच्या संकटानंतर केंद्र व राज्य सरकारने आपत्ती व्यवस्थापनाकडे लक्ष दिले आहे. त्याच्या स्वतंत्र संघटना उभ्या केल्या आहेत. त्यात राज्यातील या संघटनेचे मुख्य कार्यालय पुण्याजवळ आहे. त्याचीच शाखा मुंबईत स्थापन करण्याबाबत हालचाली सुरू आहेत. जिल्ह्यातील अनेक ठिकाणचे पूल बांधण्याचा निर्णय झाला आहे. त्यात कोयनेवरील संगमनगर धक्का व तांबवेच्या पुलाचा समावेश आहे. ते काम लवकरच हाती घेतले जाणार आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षांनिमित्तच्या शंभर कोटी निधींच्या कामातून सातारा, कराडला वसतिगृह टिळक हायस्कूलसाठी २ कोटी, सैनिक स्कूलसाठी ५ कोटी, विमानतळ विस्तारीकरण, आगाशिव डोंगर व अजिंक्यतारा किल्ल्यावरील कामे, कास पठार व महाबळेश्वर येथील विविध कामे हाती घेण्यात आली आहेत असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी एन. व पोलीस अधीक्षक के. एम. एम. प्रसन्ना यांच्या बदलीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने देव पाण्यात ठेवले आहेत त्याचे काय, या प्रश्नावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हसले ते म्हणाले, की कोणी पाण्यात देव ठेवले म्हणून कोणाच्या बदल्या होत नसतात. बदल्या होण्याची प्रक्रिया असते. कोणी देव पाण्यात ठेवत असेल तर ठेवू देत, किती दिवस ठेवतात ते बघू?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा