महाराष्ट्राला आधुनिक महाराष्ट्र करण्यात यशवंतराव चव्हाण यांचा फार मोठा वाटा आहे. त्यांनी त्यावेळी दुरदृष्टी ठेवून राबवलेल्या अनेक योजनांमुळेच महाराष्ट्र आजही देशातील आघाडीचे राज्य आहे, असे प्रतिपादन माजी न्यायमूर्ती संभाजीराव म्हसे यांनी केले.
यशवंतराव चव्हाण व्यासपीठाने यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित व्याख्यानमालेत म्हसे यांचे व्याख्यान झाले. सहकार सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री शंकरराव कोल्हे होते. हमाल पंचायतीचे अध्यक्ष शंकरराव घुले यांना यावेळी व्यासपीठाच्या वतीने जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. स्वामी रामानंद विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माजी खासदार शंकरराव काळे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. म्हसे यांनी सांगितले की चव्हाण हे द्रष्टे नेते होते. महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर महाराष्ट्राला सर्व क्षेत्रात प्रगतीपथावर नेण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम केले. आजही राज्यालाच नव्हे तर देशालाही त्यांच्याच विचारांची गरज आहे. माजी मंत्री कोल्हे यांनी यावेळी चव्हाण यांच्या आठवणी सांगून जिल्ह्य़ासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाची माहिती दिली.
व्यासपीठाचे अध्यक्ष रामनाथ वाघ यांनी उपस्थितांचे स्वागत केले. जीवनगौरव पुरस्काराबद्दल घुले यांनी व्यासपीठाचे आभार मानले. कार्यक्रमाला माजी खासदार दादा पाटील शेळके, माजी आमदार दादा कळमकर, भास्करराव डिक्कर, डॉ. रावसाहेब अनभुले, खासेराव शितोळे आदी उपस्थित होते. दशरथ खोसे यांनी सूत्रसंचालन केले. पोपट काळे यांनी आभार मानले.

Story img Loader