महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी समृद्ध महाराष्ट्र घडविण्यासाठी दूरदृष्टीने प्रयत्न केले. नीती आणि राजकारणाचा समन्वय साधून कला-साहित्य-संस्कृतीच्या विकासासाठी कृतिशील योगदान दिले. तीच परंपरा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आपापल्या परीने जोपासली आहे. महाराष्ट्र ही उत्कृष्ट नेतृत्वाची खाण आहे. पण आजच्या राजकारणाचे चित्र पाहता फार आशा नाही. त्यासाठी जबाबदार नेतृत्वाची गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे येथील विभागीय केंद्र आणि विश्वास बँक यांच्या वतीने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त आयोजित ‘यशवंतराव ते विलासराव’ या विषयांवर भावे बोलत होते. सातत्याने महाराष्ट्राच्या विकासाचा विचार करणारी ही व्यक्तिमत्त्वे माणूस म्हणूनही मोठी होती. लोकहितासाठी त्यांनी राजकीय द्वेष बाजूला ठेवला. हे त्यांचे मोठेपण होते. विचार, व्यवस्था, परिवर्तन यांचा सातत्याने विचार करणारी ही सर्व समाजकारणी होती. त्यांचा आदर्श आजच्या नेत्यांनी घेण्याची गरज आहे. संस्कारांचे राजकारण पुन्हा सजविण्याची आवश्यकता आहे, असेही त्यांनी नमूद केले. यावेळी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधायक आणि विकासात्मक कार्याचा वेध घेत भावे यांनी अनेक आठवणी कथन केल्या. प्रास्ताविक विश्वास ठाकूर यानी केले. भावे यांचा सन्मान विनायकदादा पाटील यांनी केला. व्यासपीठावर आ. जयप्रकाश छाजेड, डॉ. शोभा बच्छाव उपस्थित होते.

Story img Loader