शेतकऱ्यांनी पाण्याचे व्यवस्थित नियोजन केल्यास दुष्काळ दूर करायला मदत होऊ शकते. शिरपूर पद्धतीसारखा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात राबविला जाणे आवश्यक आहे, अशी अपेक्षा शिरपूर पद्धतीचे जनक डॉ. सुरेश खानापूरकर यांनी व्यक्त केली.
येथील महाकवी कालिदास कलामंदिरात पूर्वा केमटेक प्रा. लि. यांच्या वतीने आयोजित ‘सेवरचा मानकरी शेतकरी’ पुरस्कार सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
बक्षिसांचे मूल्य जास्त नसले तरी आपुलकीची व कौतुकाची थाप शेतकऱ्यांना सुखावून जाते, असे पूर्वा केमटेकचे संस्थापक बी. बी. पवार यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी शेतीपूरक उद्योगांकडे जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करून दुष्काळावर मात करायला हवी, असा सल्ला संचालक संजय पवार यांनी दिला.
या सोहळ्यात विजेत्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन गौरविण्यात आले. याशिवाय पूर्वा शेतकरी बक्षीस योजनेचा निकाल, उत्कृष्ट लेख व कविता व शालेय विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या निबंध, चित्रकला स्पर्धेच्या विजेत्यांचा सत्कार करण्यात आला. कलाकार विजय कदम, अंशुमन विचारे व इतरांनी कार्यक्रमात रंग भरला.

Story img Loader