* महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीवरही विशेष कोश
* प्रमाण मराठी शब्दकोशात दीड लाख शब्दांचा समावेश
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे विविध कोश प्रकाशित करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला असून मराठी वाङ्मयकोश प्रकल्पापैकी चार खंड तर प्रमाण मराठी भाषा शब्दकोशांच्या दहापैकी पाच खंडही आत्तापर्यंत प्रकाशित झाले आहेत. अन्य कोशांचे कामही प्रगतिपथावर असून मंडळाच्या या उपक्रमातून महाराष्ट्राचा सामाजिक, भाषाविज्ञान आणि सांस्कृतिक इतिहास उलगडला जाणार आहे.
या प्रकल्पामध्ये मराठी भाषा विज्ञान, लेखनशैली, समीक्षा आणि अन्य काही संबंधित विषयांवर श्री. पु. भागवत, डॉ. विजया राजाध्यक्ष आदी तज्ज्ञ मंडळींनी यात लेखन केले आहे. प्रमाण मराठी भाषा शब्दकोशाअंतर्गत प्रचलित-व्यावहारिक प्रमाण मराठी भाषेतील मराठी शब्दांचे भांडार यात उपलब्ध असेल. प्रमाण मराठी भाषेतील अद्ययावत शब्दांचा यात समावेश असून ही संख्या सुमारे दीड लाख असेल, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष मधू मंगेश कर्णिक यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.
विज्ञान ग्रंथमाला, मराठी विज्ञान परिषदेच्या सहकार्याने मंडळाने विज्ञान आणि तंत्रज्ञान कोश प्रकाशित करण्यात आला असून सर्व शिक्षण अभियान उपक्रमाअंतर्गत संपूर्ण राज्यातील शाळा, महाविद्यालयांतून या कोशाच्या १४ हजारांहून अधिक प्रतींचे वितरण करण्यात आले आहे. या कोशात डॉ. जयंत नारळीकर, डॉ. बाळ फोंडके आदी मान्यवरांनी लेखननोंदी केल्या आहेत. हा कोश म्हणजे आधुनिक तंत्रविज्ञान साहित्यात महत्त्वाचा टप्पा मानला जात असल्याचेही कर्णिक म्हणाले.
मराठी भाषेचा व्युत्पत्ती कोश तयार करण्याचे कामही हाती घेण्यात आले असून प्रा. रामदास डांगे हे शब्दकोश आणि व्युत्पत्तीकोश प्रकल्पाचे प्रमुख म्हणून काम पाहात आहेत. महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीवरही विशेष खाद्य संस्कृती कोश तयार करण्यात येत आहे. डॉ. अनुपमा उजगरे याचे काम पाहात आहेत. डॉ. अशोक केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘वचन कोश’ही प्रस्तावित आहे. तसेच नाटय़ संज्ञा कोश, अलंकार आणि वेशभूषा कोश, हस्तकला कोश यांचेही काम सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

Story img Loader