पोलीस भरती मोठय़ा प्रमाणात होत असली तरी संबंधितांना प्रशिक्षण देण्याची पुरेशी व्यवस्था नाही. ही बाब लक्षात घेऊन शासनाने जळगाव जिल्ह्यातील वरणगाव येथे नवीन पोलीस प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच महाराष्ट्र पोलीस अकादमीला स्वायत्त संस्थेचा दर्जा देण्यात आला असून अत्याधुनिक सुविधांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या१११ व्या सत्रातील प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांचा दीक्षांत सोहळा बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. याप्रसंगी ते बोलत होते. पोलिसांना पदोन्नतीऐवजी ३० टक्के प्रोत्साहन भत्ता देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. सेवेतील अधिकाऱ्यांना कायमस्वरुपी प्रशिक्षण मिळावे यासाठी माहिती तंत्रज्ञानाच्या आधारे ई व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. मुख्य कवायत मैदानावर झालेल्या या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून गृहराज्यमंत्री (ग्रामीण) राम शिंदे, पोलीस महासंचालक संजीव दयाळ, अपर पोलीस महासंचालक डॉ. के. व्यंकटेशन्, अकादमीचे संचालक नवल बजाज उपस्थित होते. अकादमीतून वर्षभराचे खडतर प्रशिक्षण घेऊन ५४२ प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षकांची तुकडी दलात समाविष्ट झाली. त्यात १३२ युवतींचा सहभाग आहे. प्रशिक्षणादरम्यान वेगवेगळ्या विषयांत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल दिल्या जाणाऱ्या पारितोषिकांत सातारा येथील एकता पवारने सहा बक्षिसे पटकावली. हा धागा पकडून मुख्यमंत्र्यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या कामात महिला वर्ग पुढे येत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. युवतींच्या माध्यमातून पोलीस दलास मोठी शक्ती प्राप्त झाली असून दलाच्या कामकाजात मानवतेचा चेहरा लाभण्यास मदत होणार आहे. पोलीस दलात शिस्तीला महत्व आहे. या ठिकाणी काम करताना काहींना गर्विष्ठपणा येतो. दैनंदिन कामकाजात उपकार केल्याची भावना जाहीर केली जाते. ज्या टप्प्यावर अशी भावना निर्माण होईल, तिथून ऱ्हासाची सुरूवात होते. संधी मिळाल्यावर केलेल्या चुका सुधारण्याची संधी पुन्हा मिळत नाही. जनसेवा हे उपकार नाही तर आपले कर्तव्य आहे, अशी जाणीव फडणवीस यांनी करून दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र पोलीस अकादमी तसेच पोलीस दलासाठी शासनाने घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. अकादमीला स्वायत्तता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रदीर्घ काळापासून रेंगाळलेला हा विषय मार्गी लागला आहे. अकादमीतील बहुतांश व्यवस्था ब्रिटीशकालीन आहे. प्रशिक्षणार्थीसाठी मूलभूत सुविधा, निवासस्थाने, सभागृह आणि अन्य सुविधांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. पोलीस दलात विविध पदांवर मोठय़ा प्रमाणात भरती केली जात आहे. संबंधितांना प्रशिक्षण देण्यासाठी पुरेशा सुविधा उपलब्ध नाहीत. यामुळे वरणगाव येथे नव्या पोलीस प्रशिक्षण केंद्राची स्थापना केली जाणार आहे. नव्या आव्हानांना पोलीस अधिकाऱ्यांना सामोरे जाता यावे म्हणून ‘इ’ प्रशिक्षण देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. पोलिसांचे काम कार्यक्षमतेने व्हावे म्हणून पदोन्नती ऐवजी ३० टक्के प्रोत्साहन भत्ता देण्याची सूचना मान्य करण्यात आल्याचे फडणवीस यांनी नमूद केले. यावेळी गृहराज्यमंत्री शिंदे यांचेही भाषण झाले. तसेच बजाज यांनी अकादमीच्या वाटचालीचा आढावा घेतला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा