लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत बंदोबस्तासाठी गुंतलेले पोलीस बघून सोनसाखळी चोरांनी अक्षरश: धुडगूस घातला असून नवी मुंबईत तर प्रत्येक दिवशी सरासरी तीन चोऱ्या होत असल्याचे आढळून आले आहे. सोनसाखळी चोरून मुंबई, ठाणे, मुंब्र्य़ाकडे धूम ठोकणाऱ्या चोरटय़ांचे चेहरे हेल्मेटमुळे टोलनाक्यांवर बसविण्यात आलेल्या सीसी टीव्ही कॅमेऱ्यात टिपले जात नसल्याने आता टोलनाक्यावरून जाणाऱ्या प्रत्येक मोटारसायकलस्वाराला हेल्मेट काढण्याची सक्ती पोलीस करणार असल्याचे समजते.
नवी मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्त फत्तेसिंग पाटील यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या अखत्यारीत सध्या सोनसाखळी चोरटय़ांनी उच्छाद मांडला आहे. दिवसाला तीन-तीन ठिकाणी चोऱ्या करून चोरटय़ांनी नव्याने आलेले पोलीस आयुक्त के. एल. प्रसाद यांना जणूकाही एकप्रकारे आव्हान दिले आहे. सोन्याचे भाव गगनाला भिडल्याने सोनसाखळी चोरीच्या घटना प्रत्येक मोठय़ा शहरात वाढल्या आहेत. पण त्यात नवी मुंबई इतर शहरांपेक्षा आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे.
लोकसभा निवडणुकीच्या ऐन रणधुमाळीत पोलीस राजकीय नेते, नाका तपासणी, निवडणूक अधिकाऱ्यांच्या बैठका, मतदान केंद्राची काळजी यात व्यस्त झाल्याने सोनसाखळी चोरटय़ांनी संधीचे सोने करण्याची तयारी सुरू केली आहे. गुन्हा करून मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, पनवेल या नवी मुंबईच्या वेशी ओलांडून जाण्याची गुन्हेगारांची मानसिकता वाढली आहे. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी सोनसाखळी चोरांच्या पकडण्यात आलेल्या टोळीने चेंबूर आणि मुंब्रा ही आपली चोरी केल्यानंतर लपण्याची चांगली ठिकाणे असल्याचे सांगितले होते. नवी मुंबईतून मुंबईत प्रवेश करताना लागणाऱ्या वाशी व ऐरोली टोलनाक्यांवर सीसी टीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. या ठिकाणी प्रत्येक वाहनचालकांच्या वाहनाचा नंबर व त्याची छबी टिपली जात आहे. पण मोटारसायकलस्वारांना हेल्मेट घालण्याची सक्ती असल्याने ते टोलनाक्याच्या एका रांगेतून हेल्मेट घालूनच ये-जा करीत असल्याचे दिसून येते. किंबहुना टोलनाक्याच्या पलीकडे परवाना आणि हेल्मेट तपासणीसाठी उभ्या असलेल्या वाहतूक पोलिसांना घाबरून काही मोटारसायकलस्वार नाक्याच्या अलीकडे हेल्मेट घालत असतात. नवी मुंबईत गुन्हा करून असे अनेक गुन्हेगार परागंदा झाल्याचे आढळून आले आहे. शहरात विविध ठिकाणी बसविण्यात आलेल्या २६२ सीसी टीव्ही कॅमेऱ्यांमुळे आतापर्यंत अनेक गुन्ह्य़ांची उकल झालेली आहे. यात हेल्मेट न घालता सोनसाखळी चोरी केलेल्या चोरटय़ांना सीसी टीव्ही फुटेजमुळे पकडण्यात आलेले आहे. त्यामुळे सोनसाखळी चोरांनी आता हेल्मेट घालण्याचे तंत्र चांगलेच आत्मसात केले आहे. यावर उपाय म्हणून नवी मुंबईत ये-जा करणाऱ्या प्रत्येक मोटारसायकलस्वाराला टोलनाक्यावर हेल्मेट काढून एकप्रकारे सलामी द्यावी लागणार आहे.
नवी मुंबईचे प्रवेशद्वार असणाऱ्या सीबीडी उड्डाणपूल, ठाणे मुकंद कंपनी, शिळफाटा पेट्रोलपंप, उरण मार्गावरील आम्रमार्गावर टोलनाके नसल्याने सीसी टीव्ही बसविण्यात आलेले नाहीत. पण गुन्हेगारांची या वेशीवरून होणारी सर्रास ये-जा पाहता पोलीस या ठिकाणी सीसी टीव्ही बसविण्याचा विचार करीत आहेत. तोपर्यंत वाशी व ऐरोली येथील टोलनाक्यांवर मोटारसायकलस्वारांना हेल्मेट उतरवून टोल नाका पार करावा लागणार आहे. वाढत्या सोनसाखळी चोरांना पायबंद बसावा यासाठी अशा उपाययोजनांचा आम्ही विचार करीत आहोत, असे अतिरिक्त आयुक्त फत्तेसिंग पाटील यांनी सांगितले.

Story img Loader