राष्ट्रीय महिला खो-खो स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळवण्यात महाराष्ट्राच्या संघातील नगरच्या दोन खेळाडूंनी मोठा सहभाग दिला. अष्टपैलू खेळ करत संघाला विजयपथावर नेणाऱ्या या खेळाडूंची नावे पूनम घोडेस्वार व अंजली आडेप अशी आहेत. नोव्हेंबर २० ते २४ दरम्यान उत्तरप्रदेश येथे ही ३८ वी राष्ट्रीय महिला खो-खो स्पर्धा झाली. गोवा, गुजरात, पंजाब, छत्तीसगड, केरळ, मध्यप्रदेश या दिग्गज संघांचा पराभव करत महाराष्ट्राने अंतिम सामन्यात प्रवेश केला. त्यांची लढत दिल्ली संघाबरोबर झाली. त्यात त्यांनी रौप्यपदक मिळवले. सर्वच सामन्यात नगरच्या या दोन्ही खेळाडूंनी दैदिप्यमान कामगिरी केली. संरक्षण, गडी बाद करणे अशी अष्टपैलू कामगिरी त्यांनी सातत्याने केली व संघाला अंतिम फेरीपर्यंत नेले. अंतिम सामन्यातही दोघींनी चांगली कामगिरी केली. पूनम न्यू आर्टस महाविद्यालयात इयत्ता ११ वीची विद्यार्थीनी आहे, तर अंजली समर्थ विद्या मंदिर प्रशाला सावेडी येथे इयत्ता १० वीला आहे. एकलव्य क्रीडा मंडळाच्या त्या खेळाडू आहेत. छत्रपती पुरस्कार विजेते निर्मल थोरात त्यांना मार्गदर्शन करतात. खो-खो संघटनेचे अध्यक्ष अशोक पितळे, जिल्हा क्रीडाधिकारी अजय पवार, राष्ट्रीय क्रीडा मार्गदर्शक सुधीर चपळगावकर, डॉ. शेळके यांनी दोघींचे अभिनंदन केले आहे.   

Story img Loader