शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती व्हावी, शेतीशी निगडीत घटकांची जगात वेळोवेळी होत असलेल्या बदलाची माहिती व्हावी, यासाठी राज्य शासन राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर ‘अभ्यास दौरे’ आयोजित करणार आहे. या दौऱ्यासाठी शासन २३ लाख ३३ हजार रुपये खर्च करणार असून त्यास मान्यताही देण्यात आली आहे.
राज्यातील शेतकऱ्यांचे केवळ उत्पादन व उत्पादकता वाढविणे हे ध्येय न राहता उत्पादित होणाऱ्या शेती मालाला चांगला दर्जा देऊन चांगला भाव मिळण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर शेतकऱ्यांनी करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. शेतीशी निगडीत घटकांबाबत जगात वेळोवेळी होत असलेले बदल, विकसित होत असलेले तंत्रज्ञान हे शेतकऱ्यांपर्यंत त्यांच्या गरजेनुरुप योग्यवेळी पोहोचविणे आणि त्यासाठी आवश्यक सहाय्य व सोयी सुविधा पुरविणे निकडीचे आहे. कृषी विस्तार कार्यक्रमाद्वारे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देण्यासाठी कृषी विभागाकडून विविध प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ‘राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे’ आयोजित करण्यात येत आहे. ही योजना २००४-०५ या वर्षांपासून राबवण्यात येत आहे. मंजूर केलेला निधी खर्च करण्याची जबाबदारी राज्याच्या कृषी आयुक्तांकडे (पुणे) सोपवण्यात आली आहे. विदेशातील अभ्यास दौऱ्यातील शेतकऱ्याची निवड पारदर्शक असावी व निवडीमध्ये पुनरावृत्ती नसावी, वितरीत निधीचे उपयोगिता प्रमाणपत्र पुढील निधी वितरीत करण्यापूर्वी शासनास सादर करावे. अभ्यास दौऱ्याच्या फलनिष्पत्तीबाबत प्रतिवर्षांचा एकत्रित अहवाल पुढील वर्षांच्या अभ्यास दौऱ्यास मान्यता देण्याच्या प्रस्तावासोबत शासनास सादर करावा, अशा सूचनाही शासनाने काढलेल्या परिपत्रकाद्वारे कृषी आयुक्तांना करण्यात आल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा