विविध कलाप्रकारांची जोपासना व संवर्धन करण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न करणाऱ्या ११ कलावंतांना सोमवारी एका शानदार सोहळ्यात ‘राज्य सांस्कृतिक पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. विविध राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या काही ज्येष्ठ कलावंतांचाही या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला.
आशा जोगळेकर (संगीत नृत्य), प्रशांत दामले (नाटक), पं. शरद साठे (कंठसंगीत), उत्तरा केळकर (उपशास्त्रीय संगीत), अलका कुबल (मराठी चित्रपट), मीरा उमप (कीर्तन, समाजप्रबोधन), रघुवीर खेडकर (तमाशा), बजरंग आंबी (शाहिरी), छाया खुटेगावकर (लोककला), पं. वसंतराव शिरभाते (आदिवासी गिरिजन कला) आणि डॉ. परशुराम खुणे (कलादान) या कलावंतांच्या कार्याची दखल घेऊन राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाने त्यांचा गौरव केला. शाल, श्रीफळ, मानचिन्ह व रोख एक लाख रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
सांस्कृतिक कार्यमंत्री संजय देवतळे आणि आमदार दिवाकर रावते यांच्या हस्ते या कलावंतांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. एका वर्षांत नाटकाचे विक्रमी ४६९ प्रयोग करणारे प्रशांत दामले, विज्ञानाचे पदवीधर व नंतर कमर्शिअल आर्टिस्ट असूनही सुरांच्या ओढीने ग्वाल्हेर घराण्याचे शिलेदार शरद साठे, ‘महाराष्ट्राची तीजनबाई’ अशी ओळख लाभलेल्या मीरा उमप, ५७ वगनाटय़े करणारे रघुवीर खेडकर, आदिवासी अंध मुलांना संगीताचे शिक्षण देणारे वसंतराव रिभाते आणि विदर्भाच्या झाडीपट्टी रंगभूमीवर ८०० नाटकांचे ५ हजार प्रयोग करणारे परशुराम खुणे यांच्यासह सर्वच कलाकारांना उपस्थितांनी टाळ्यांची जोरदार दाद दिली. अनंत बेडेकर यांनी या माहितीपूर्ण दृक्श्राव्य फिती तयार केल्या होत्या.
राज्यातील नाटकाची ५६८ थिएटर्स दुरुस्त करावीत, असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्र्यांना करतानाच, मनावर घेतलंत तर पुढच्या ५ वर्षांत हे काम सहज शक्य आहे, असे ते म्हणाले.
याव्यतिरिक्त राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या ज्येष्ठ कलावंत कनक रेळे (शास्त्रीय नृत्य), कमलाकर सोनटक्के (नाटय़ दिग्दर्शन), कृष्णा बोरकर (रंगभूषा), शेख रियाझुद्दीन उर्फ राजूबाबा (लोककला) व राजश्री शिर्के (शास्त्रीय नृत्य) यांचा संचालनायातर्फे शाल, श्रीफळ, सन्मानपत्र व १ लाख रुपये या स्वरूपातील पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. सांस्कृतिक क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी सांस्कृतिक कार्य संचालनालय असेच उपक्रम हाती घेत राहील, अशी ग्वाही मंत्री संजय देवतळे आणि संचालक आशुतोष घोरपडे यांनी दिली. दिवाकर रावते यांचेही समयोचित भाषण झाले. अतिशय आकर्षक व्यासपीठावर झालेल्या या कार्यक्रमाचे संचालन ज्योती आंबेकर यांनी केले, तर संचालनालयाचे सहसंचालक मनोज सानप यांनी आभार मानले.
राज्य सांस्कृतिक पुरस्कारांचे शानदार सोहळ्यात वितरण
विविध कलाप्रकारांची जोपासना व संवर्धन करण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न करणाऱ्या ११ कलावंतांना सोमवारी एका शानदार सोहळ्यात ‘राज्य सांस्कृतिक पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.
First published on: 26-02-2014 at 01:02 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra states cultural award distribution ceremony