‘गुंफण अकादमी’ ने तळागाळातील ग्रामीण लेखकांना व्यासपीठ देण्याचे महत्त्वाचे कार्य केले आहे. आज गोव्यात येऊन येथील माणसं, सांस्कृतिक वारसा, भाषा, प्रेम यांचे दर्शन घडवले असल्याचे समाधान काँग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्ष आनंदराव पाटील यांनी व्यक्त केले.
सातारा येथील गुंफण अकादमी व गोव्यातील माधव राघव प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने पणजी येथे नुकत्याच झालेल्या ११ व्या गुंफण सद्भावना संमेलनात ते बोलत होते. व्यासपीठावर माजी केंद्रीयमंत्री व कोकण मराठी परिषद गोव्याचे अध्यक्ष अ‍ॅड. रमाकांत खलप, गोवा विधानसभेचे सभापती राजेंद्र आर्लेकर, ग्रामीण कथाकर बबन पोतदार, गुंफण अकादमीचे अध्यक्ष बसवेश्वर चेणगे, भाई पंजाबराव चव्हाण, कादंबरीकार गुरूनाथ नाईक, अंकुशराव गोरे, भगवंत इंगळे, अरूण सकट, लेखिका निरूपमा नेने, डॉ. मधुकर नेने, जिजामाता बँकेच्या अ‍ॅड. वर्षां माडगूळकर, अनघा देशपांडे, जयवंतराव बेगमपुरे उपस्थित होते.
अ‍ॅड. रमाकांत खलप म्हणाले की, गोवा आणि महाराष्ट्राचे नाते अतूट आहे. मराठी भाषेची पाळेमुळे गोव्यात पूर्वापार रूजलेली आहेत. गोमंतभूमी संत ज्ञानेश्वरांचे माहात्म्य सांगणारी आहे. मात्र, प्रांताप्रांतातच नव्हे, तर सातासमुद्रापलीकडे मराठी भाषा टिकवण्याचे काम करणाऱ्यासाठी महाराष्ट्राने काय केले, असा सवाल त्यांनी केला. कार्यक्रमात सातारच्या सहा पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. त्यात चित्रा क्षीरसागर (गोवा), रणजित शहा (मसूर, जि. सातारा), शाहीर आझाद नायकवडी (कोल्हापूर), प्रा. तुकाराम पाटील (पुणे) या साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. या प्रसंगी प्रकश क्षीरसागर यांच्या ‘म्हणीच्या गोष्टी’, शिरीष कुलकर्णी यांच्या ‘पदरचे घातले नाही’, महालिंग मेणकुदळे यांच्या ‘असे प्रेम, अशी माणसं, असा त्याग’ व ‘शुक्रतारा उगवला’, बबन पोतदार यांच्या ‘आक्रीत’ (पाचवी आवृत्ती) व ‘गुंजेचा पाला’ (सहावी अवृत्ती) या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.

Story img Loader