प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष सेवेत सवरेत्कृष्ट कामगिरी बजावणारे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना गुणवत्तेवर आधारित बढती मिळावी, याकरिता आपण प्रयत्नशील असल्याची माहिती गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी येथे दिली. लेखी परीक्षा आणि प्रशिक्षणातील कामगिरी यांचा केंद्रीय लोकसेवा आयोग ज्याप्रमाणे संयुक्तपणे विचार करते, तशी व्यवस्था महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पोलीस दलातील अधिकाऱ्यांबाबत करावी, या दृष्टीने प्रयत्न केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीतर्फे सोमवारी आयोजित उपनिरीक्षकांच्या १०६ व्या तुकडीच्या दीक्षान्त सोहळ्यात ते बोलत होते. प्रशिक्षणात सवरेत्कृष्ट प्रशिक्षणार्थी म्हणून पुण्याच्या हर्षदा दगडेला गौरविण्यात आले. हा धागा पकडून पाटील यांनी रझा अकॅडमीच्या मुंबईतील मोर्चानंतर पोलीस दलात महिलांचा समावेश असावा काय, याबद्दल अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचा उल्लेख केला. त्या सर्व प्रश्नांना हर्षदा दगडेने चोख उत्तर दिले असून आगामी काळात गुन्हेगारांना जरब बसू शकेल, असे महिला पोलीस अधिकारी व कर्मचारी निर्माण होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
सोमवारी सकाळी पावसाची अधूनमधून रिपरिप सुरू असल्याने नेहमी मैदानावर होणारा दीक्षान्त सोहळा प्रबोधिनीच्या सभागृहात पार पडला. मैदानावरील चिखलामुळे प्रशिक्षणार्थीचे संचलनही झाले नाही. कार्यक्रमास पोलीस महासंचालक संजीव दयाळ, पोलीस प्रबोधिनीचे संचालक संजीव बर्वे आदी उपस्थित होते. या तुकडीतील ५३२ उपनिरीक्षक पोलीस दलात दाखल झाले असून त्यात १४४ युवतींचा समावेश आहे. महिला अधिकाऱ्यांचा इतक्या मोठय़ा संख्येने समावेश असलेली बहुधा ही पहिलीच तुकडी असावी. देशाच्या सीमांचे रक्षण आणि अंतर्गत सुरक्षा व्यवस्था या दोन्ही बाबी महत्त्वपूर्ण आहेत. गेल्या काही वर्षांचा आढावा घेतल्यास सीमांचे संरक्षण करताना जेवढी मनुष्यहानी झाली, त्यापेक्षा अधिक जीवित हानी देशांतर्गत झालेली आहे, याकडे आबांनी लक्ष वेधले. दहशतवाद, नक्षलवाद अशा सर्वाना पुरून उरणारे महाराष्ट्र पोलीस हे देशातील पहिल्या क्रमांकाचे दल आहे. या आव्हानांना आता तुम्हाला सामोरे जावे लागणार असल्याची जाणीव त्यांनी उपनिरीक्षकांच्या तुकडीला करून दिली.
पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कामांचा प्रचंड ताण असतो. त्यांची कामगिरी सभोवतालच्या वातावरणावर अवलंबून असते. आपण कितीही चांगले काम केले तरी टीकेचे धनी व्हावे लागते. यामुळे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या कुटुंबीयांकडून कौटुंबिक स्वास्थ्य दिले जावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. पोलीस दलातील नेमणूक, बढत्या, बदल्या यात शिस्तबद्धता आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. पोलीस दलात ज्येष्ठता ग्राह्य धरून बढती दिली जाते. परंतु जे अधिकारी व कर्मचारी प्रशिक्षण व सेवेत उत्कृष्ट कामगिरी करतात त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कोणतीही खास योजना अस्तित्वात नाही. ही बाब लक्षात घेऊन नक्षलवादी व दहशतवादीविरोधी लढाई, कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी, एखाद्या गुन्ह्याचा यशस्वी तपास, अशी असामान्य कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना बढतीत प्राधान्य दिले जावे, याकरिता गृह विभागाने प्रस्ताव सादर करावा, अशी सूचना त्यांनी केली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने लेखी परीक्षेबरोबर प्रशिक्षणातील कामगिरीचा विचार करावा याकरिता प्रयत्न केले जातील. केंद्रीय लोकसेवा आयोगाप्रमाणे ही प्रक्रिया पार पडल्यास उत्कृष्ट कामगिरी नोंदविणाऱ्या अधिकाऱ्यांना बढतीच्या संधी उपलब्ध होण्याचा मार्ग खुला होऊ शकेल, असेही ते म्हणाले.
या वेळी प्रशिक्षणात विविध विषयांमध्ये उत्कृष्ट कामगिरी नोंदविणाऱ्या प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकाऱ्यांना गौरविण्यात आले. सवरेत्कृष्ट प्रशिक्षणार्थीचा मान पुण्याच्या हर्षदा दगडेने पटकाविला. याबद्दल गृहमंत्र्यांच्या हस्ते तिला मानाची तलवार देण्यात आली. विधी शाखेतील उत्कृष्ट प्रशिक्षणार्थी म्हणून मनोज चौधरी, पिस्तूल व रायफल शूटिंग आणि इतर क्रीडाबद्दल अजित पाटील, शारीरिक शिक्षण व उपस्थिती- शिल्पा लांबे, सवरेत्कृष्ट महिला कॅडेट (अंतर्गत विषय)- हर्षदा दगडे, सांस्कृतिक- सुरेखा कोरडे, कवायत- चेतन माने, मानवशास्त्र- सचिन कांदगे, जमावाशी सामना विषयात- दर्शन पाटील, सवरेत्कृष्ट द्वितीय प्रशिक्षणार्थी- मनोज चौधरी, चांगली वर्तवणूक- सोहन पेचे यांना गौरविण्यात आले.

शिक्षणसेविका ते पोलीस उपनिरीक्षक
पोलीस दलातर्फे गुन्हेगारांना पकडून कारवाई केली जाते. अनेक गुन्हे उघडकीस आणले जातात. मात्र बहुतांश गुन्ह्यांत गुन्हेगारांना कठोर शासन होऊ शकत नाही. कायद्याच्या ज्ञानाच्या अभावाने असे घडत असावे. यामुळे कायद्याचा अभ्यास व परिणामकारक अंमलबजावणीद्वारे ही त्रुटी दूर करून गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा देण्याकरिता आपण प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही पोलीस उपनिरीक्षकांच्या तुकडीत सवरेत्कृष्ट ठरलेल्या पुण्याच्या हर्षदा दगडे हिने व्यक्त केली. उपनिरीक्षकांच्या १०६ व्या तुकडीच्या दीक्षान्त सोहळ्यात प्रशिक्षणातील कामगिरीबद्दल गृहमंत्री पाटील यांच्या हस्ते मानाची तलवार देऊन तिला सन्मानित करण्यात आले. त्यानंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी ती बोलत होती.
पुण्याच्या एस. पी. महाविद्यालयात हर्षदाने महाविद्यालयीन शिक्षण घेतले. बी. एस्सी. इलेक्ट्रॉनिक आणि डी.एड. केल्यानंतर भोर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षणसेविका म्हणून तीन वर्षे ज्ञानदान करणारी हर्षदा यानिमित्ताने महाराष्ट्र पोलीस दलात उपनिरीक्षक म्हणून दाखल झाली आहे. तिचे वडील बाळासाहेब दगडे हे कोंढवा पोलीस ठाण्यात ‘कॉन्स्टेबल’ म्हणून कार्यरत आहेत. पोलीस दलाबद्दल लहाणपणापासून आकर्षण होते. पोलीस प्रशिक्षणाबद्दल प्रारंभी काहीशी संदिग्धता होती. मात्र प्रबोधिनीतील सर्व अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनामुळे हे प्रशिक्षण यशस्वीपणे पार पडले. विधी विषयात आपण चांगली कामगिरी करू, असा विश्वास होता. मात्र सवरेत्कृष्ट प्रशिक्षणार्थी म्हणून आपली निवड होईल असे वाटले नव्हते. मुंबईतील महिला पोलिसांना अलीकडेच सामोऱ्या जाव्या लागलेल्या प्रसंगानंतर महिला अधिकाऱ्यांना काही विशेष प्रशिक्षण देण्यात आले का, यावर बोलताना हर्षदाने ही घटना घडली म्हणून नव्हे तर, जमावाला सामोरे जाताना कोणकोणती दक्षता घ्यावी, अशी आपत्कालीन परिस्थिती कशी हाताळावी, याविषयी आधीपासूनच प्रशिक्षण देण्यात येत असल्याचे नमूद केले. सर्वसामान्यांना पोलीस दलाविषयी आत्मीयता वाटावी, असा आपला प्रयत्न राहील. सर्वसामान्य नागरिक आपल्या समस्या वा प्रश्न घेऊन प्रथमच पोलीस ठाण्याची पायरी चढतात. त्यांना धीर देऊन योग्य मार्गदर्शन करणे, महिलांवरील वाढते अत्याचार कमी करणे या विषयावर आपण प्राधान्यपूर्वक काम करू, असेही हर्षदाने सांगितले.

Story img Loader