जोतिबा फुले यांनी पहिल्यांदा धर्माची चिकित्सा केली. वेदांपासून संतसाहित्यात उतरलेला धर्म त्यांनी नाकारला; पण धर्मातर केले नाही. सत्याचा आग्रह धरण्याचा सत्यशोधक समाज त्यांना घडवायचा होता, म्हणून त्यांनी सत्यशोधक धर्म लोकांसमोर मांडला, असे मत प्राचार्य डॉ. कृष्णा इंगवले यांनी येथे व्यक्त केले.
राजर्षी शाहू मेमोरियल ट्रस्टने महात्मा जोतिबा फुले यांच्या १२२व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित केलेल्या व्याख्यानप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. जे. पवार होते.
‘महात्मा फुले आणि आजचे वास्तव’ हा विषय मांडताना डॉ. इंगवले यांनी महात्मा फुले यांच्या अलौकिक कार्याचा आढावा घेतला. पेशवाईच्या उत्तरार्धात महात्मा फुले यांचे व्यक्तिमत्त्व घडत गेले. चार्तुर्वण्य, जातीयता, गुलामी, स्त्रीदास्य हे पेशवाईच्या उत्तरार्धातही होते. मानवी जीवन धर्माने नियंत्रित केले होते, पण या धर्माची चिकित्सा संतांनीसुद्धा केली नसती. समतेच्या चळवळीला सर्वात मोठा अडथळा धर्म असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर महात्मा फुलेंनी धर्मचिकित्सा करायला सुरुवात केली. बुद्धी प्रामाण्यवाद मांडला. तेव्हा १९व्या शतकात फारसा प्रतिवाद झाला नाही, तेव्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्य होते, पण आज कुणी धर्माची चिकित्सा करत असेल तर तेवढे अभिव्यक्ती स्वातंत्र्य त्याला मिळेल असे वातावरण नाही असे डॉ. इंगवले यांनी या वेळी सांगितले.
आज नागर संस्कृतीने स्त्रीला बऱ्यापैकी स्वातंत्र्य दिले असले तरी ग्रामीण स्त्रीची अवस्था वाईट आहे. पूर्वी स्त्री जन्माला आली की तिला लीन म्हटले जायचे. आज मात्र तिला गर्भातच हीन समजून मारले जाते. सत्यशोधकी विचार समजलेले समाजात आहेत, पण सत्यशोधकी चळवळ शिल्लक राहिलेली नाही याबद्दल डॉ. कृष्णा इंगवले यांनी खंत व्यक्त केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा