पुण्यात अनेक नावाजलेली महाविद्यालये असली तरी विद्यार्थ्यांसाठी असलेल्या स्वच्छतागृहांची स्थिती मात्र त्यांच्या लौकिकाला शोभेशी नाहीत. ‘टीम लोकसत्ता’ ने शुक्रवारी विविध महाविद्यालयांमध्ये केलेल्या प्रत्यक्ष पाहणीत हे पाहायला मिळाले आणि विविध दावे करणाऱ्या महाविद्यालयांना या पातळीवर अजून बरेच काही करावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले.
पुण्यातील मध्यवर्ती भागातील फग्र्युसन महाविद्यालय, बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय, मराठवाडा मित्रमंडळ वाणिज्य महाविद्यालय, स.प. महाविद्यालय, गरवारे महाविद्यालय, नेस वाडिया, अभियांत्रिकी महाविद्यालय, मॉडर्न महाविद्यालय शिवाजीनगर आणि गणेशखिंड, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, विधी महाविद्यालय, पुणे विद्यार्थी गृह या महाविद्यालयांची प्रातिनिधिक स्वरुपात पाहणी केली. या पाहणीत लक्षात आले की, बहुतांश महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी असलेल्या स्वच्छतागृहांकडे महाविद्यालय प्रशासनाकडून लक्ष दिले जात नाही. स्वच्छतागृहांची वेळेवर स्वच्छता होत नसल्याची तक्रार यांपैकी बहुतांश महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांनी केली. स्वच्छतागृहांच्या जवळ असलेल्या विभागांमध्ये, वर्गामध्येही दरुगधी पसरत असल्याची तक्रारही विद्यार्थ्यांनी केली. अनेक महाविद्यालयांमध्ये तर सायंकाळी साडेपाच वाजल्यानंतर स्वच्छतागृहांना चक्क कुलूप घातले जाते.
विद्यार्थी संख्येच्या तुलनेत महाविद्यालयांमध्ये पुरेशी स्वच्छतागृहे नाहीत. पुण्यातील बहुतांश महाविद्यालयांचे आवार खूप मोठे आहे. मात्र, तरीही महाविद्यालयाच्या आवारातील प्रत्येक इमारतीमध्ये विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे उभारण्याची आवश्यकता महाविद्यालयाला वाटलेली नाही. बीजे वैद्यकीय महाविद्यालयाचा अपवाद वगळता इतर सर्वच महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी एकाच ठिकाणी स्वच्छतागृहांची व्यवस्था आहे. अनेकवेळा स्वच्छतागृहांमध्ये पाणी उपलब्ध नसल्याची तक्रारही विद्यार्थ्यांनी केली. अनेक ठिकाणी स्वच्छतागृहांच्या खिडक्या तुटलेल्या आहेत, दारे लागत नाहीत, नळ गळके आहेत, कचरापेटय़ांची संख्याही पुरेशी नाही. कचरापेटय़ा वेळेवर रिकाम्या केल्या जात नाहीत. त्यातल्या त्यात बीएमसीसी, वाडिया या महाविद्यालयांची स्थिती बरी आढळली.
महाविद्यालयांमधील स्वच्छतागृहांच्या अवस्थेबाबत विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यास, स्वच्छतागृहांची परिस्थिती समाधानकारक नसल्याचीच प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली. ‘स्वच्छतागृहांची वेळेवर स्वच्छता होत नसल्याची तक्रार शिवाजीनगर येथील मॉडर्न महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी केली. पुरेशा प्रमाणात स्वच्छतागृहं नसल्याची तक्रार अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी केली. ‘कचरापेटय़ा ठेवल्या जात नाहीत, तसेच स्वच्छतागृहांची वेळेवर स्वच्छता होत नसल्यामुळे वर्गामध्येही कधी कधी दरुगधी पसरते,’ असे पुणे विद्यार्थी गृहाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सांगितले. महाविद्यालयातील अस्वच्छ स्वच्छतागृहामध्ये जाण्याचे टाळत असल्याची प्रतिक्रिया फग्र्युसन महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी दिली. या विद्यार्थीनींनी सांगितले, ‘‘स्वच्छतागृह इतके अस्वच्छ असते, की तेथे जाण्याची किळस वाटते. स्वच्छतागृहामध्ये पुरेसे पाणीही उपलब्ध नसते.’’  महाविद्यालयाचे आवार मोठे आहे. सर्व विभाग आणि इमारती दूर आहेत. मात्र, स्वच्छतागृह आवारात एकाच ठिकाणी आहे, त्यामुळे खूप अडचण होत असल्याची प्रतिक्रिया स. प. महाविद्यालयातील विद्यार्थीनींनी केली. बी. जे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सांगितले, ‘स्वच्छतागृहे पुरेशी आहेत, मात्र, स्वच्छतागृहांमधील नळ गळके आहेत.’ मराठवाडा मित्रमंडळ महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी सांगितले, ‘लेडीज रूमची अवस्था अत्यंत वाईट आहे. स्टाफसाठी असलेल्या स्वच्छतागृहांची स्वच्छता होते. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी असलेल्या स्वच्छतागृहांकडे लक्ष देण्याची आवश्यकता महाविद्यालयाला बहुदा वाटत नसावी.’ स्वच्छतागृहांच्या दारांच्या कडय़ा तुटलेल्या आहेत, तसेच खिडक्यांच्या काचाही फुटलेल्या आहेत, अशी तक्रार गरवारे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी केली.       
  ‘एलआयसी’ काय करतात?
पुणे विद्यापीठाची ‘लोकल इन्व्हेस्टिगेशन कमिटी’ (एलआयसी)महाविद्यालयाला भेट देते, त्या वेळी विद्यार्थ्यांसाठी सर्व पायाभूत सुविधा आहेत का, त्यांचा दर्जा कसा आहे याची पाहणी करणे अपोक्षित असते. यामध्ये महाविद्यालयांमध्ये पुरेशी स्वच्छतागृहे आहेत का, ती नीट आहेत का, हे एलआयसीने पाहणे अपेक्षित आहे. मात्र, यांपैकी एकाही महाविद्यालयातील पायाभूत सुविधांबाबत एलआयसीने आक्षेप घेतलेला नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा