गणेशोत्सवाच्या काळात रस्त्यांवरील दिव्यांच्या खांबावरून अथवा शेजारच्या सोसायटीतून चोरून घेतलेल्या विजेवर रोषणाईचा झगमगाट करणाऱ्या मंडळांच्या विरोधात महावितरणने दंडात्मक कारवाईचा इशारा दिला असून खास दामिनी पथकाच्या वतीने अशा चोरटय़ांवर वीज कायद्यानुसार दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. गणेशोत्सवाच्या काळात महावितरणच्या वतीने हंगामी स्वरूपात तात्काळ अधिकृत वीजजोडणी उपलब्ध करून देण्यात येते. मंडळांनी त्याचा लाभ घेऊन संभाव्य कारवाई टाळावी, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे. ठाणे आणि वाशी शहरात गेल्या तीन वर्षांमध्ये महावितरणकडून अधिकृत वीजजोडणी घेणाऱ्या गणेश मंडळांची संख्या वाढल्याची माहितीही महावितरणच्या वतीने देण्यात आली आहे.
गणेशोत्सवाच्या विद्युत रोषणाईसाठी वीजचोरी करण्याचे प्रकार गेल्या काही वर्षांपासून वाढू लागले असून या प्रवृत्तीमुळे अपघात होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे महावितरणने यंदाही गणेशोत्सव मंडळांना अधिकृतपणे तात्पुरत्या स्वरूपाची वीजजोडणी देण्याची योजना हाती घेतली आहे. या जोडणीसाठी महावितरणच्या कार्यालयात मंडळांना अर्ज करावा लागणार असून त्यानंतरच त्यांना ही वीजजोडणी देण्यात येणार आहे. अशी अधिकृत वीजजोडणी गणेश मंडळांनी करून घ्यावी, असे आवाहन भांडुप नागरी परिमंडळाचे मुख्य अभियंता सतीश करपे यांनी केले आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये ठाणे आणि वाशी शहरात अधिकृत वीजपुरवठा घेणाऱ्या मंडळांची संख्या वाढत असून ठाणे शहरात २०११ मध्ये- २५५, २०१२ मध्ये २७२ तर २०१३ मध्ये ४५५ गणेश मंडळांनी अधिकृत वीजजोडणी करून घेतली होती. वाशी शहरात २०११ मध्ये २१०, २०१२ मध्ये २८६, तर २०१३ साली ३४४ सार्वजनिक मंडळांनी अधिकृत वीजपुरवठा करून घेतला होता. वीजचोरी करणाऱ्या मंडळांवर महावितरणच्या दामिनी पथकाची करडी नजर असून दोषी मंडळांवर वीज कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा महावितरणच्या वतीने करण्यात आला आहे.
तात्काळ वीजजोडणी
तात्पुरती वीजपुरवठा घेण्यासाठी गणेशोत्सव मंडळांनी महावितरणच्या ६६६.ेंँं्िर२ूे.्रल्ल या संकेतस्थळावरून नवीन वीजजोडणीसाठी ऑनलाइन अर्ज दाखल करावेत. या अर्जासोबत आवश्यकतेनुसार स्थानिक सक्षम अधिकाऱ्यांचे ना हरकत किंवा पोलीस अधिकाऱ्यांचे ना हरकत प्रमाणपत्र व वीजजोडणीचा चाचणी अहवाल देणे गरजेचे आहे. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता व रकमेचा भरणा केल्यानंतर तात्काळ वीजजोडणी मंजूर करण्यात येणार आहे, अशी माहिती महावितरणच्या वतीने देण्यात आली आहे.
जागरूकता वाढली
विविध संस्थांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या आदर्श गणेशोत्सव मंडळांच्या स्पर्धामध्ये विजेच्या वापरासंदर्भातील निकषांचा समावेश होऊ लागला आहे, तर सामाजिक संस्थांनी विजेच्या वापराविषयी केलेल्या प्रबोधनामुळे गणेशोत्सव मंडळांमध्ये जागरूकता निर्माण झाली आहे. त्यामुळेच उत्सवामध्ये कमीतकमी विद्युत रोषणाईचा समावेश करण्याबरोबरीनेच उत्सवासाठी लागणारा सर्व वीजपुरवठा अधिकृतपणे घेण्याकडे मंडळांचा कल वाढला आहे. त्यामुळे उत्सवाच्या काळात विजेच्या खांबावरून घेण्यात येणाऱ्या वीजजोडणीचे प्रमाण घटू लागल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा