वीजबिलांची थकबाकी असलेल्या ग्राहकांचा वीजपुरवठा तोडण्याबाबत ‘महावितरण’ने सुरू केलेली कारवाई नव्या वर्षांतही सुरू राहणार आहे. ‘वीजबिल भरणाऱ्यांनाच वीजपुरवठा’ या सूत्रानुसार या वर्षांतही थकबाकीदारांना ‘महावितरण’चा इटका मिळणार आहे.
नियमित वीजबिल भरणाऱ्यांची संख्या मोठी असली, तरी अनेक दिवस बिलांचा भरणा न करणाऱ्यांची संख्याही मागील काही काळात वाढली होती. त्यांच्याकडे असलेल्या कोटय़वधी रुपयांच्या थकबाकीच्या वसुलीसाठी ‘महावितरण’ने राज्यभर कठोर कारवाईची मोहीम हाती घेतली. पुणे परिमंडलातही या मोहिमेअंतर्गत कारवाई करण्यात आली. मागील वर्षांच्या उत्तरार्धात ही कारवाई तीव्र करण्यात आली.
पुणे, िपपरी-चिंचवड शहरांसह राजगुरुनगर, मंचर व मुळशी विभागात डिसेंबर महिन्यामध्ये केलेल्या कारवाईत तब्बल ९१ हजार थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. याच महिन्यात थकबाकीदारांकडून २४ कोटी रुपयांची वसुली करण्यात आली. वीजपुरवठा तोडल्यानंतर परस्पर वीजपुरवठा सुरू करण्याचे प्रकार लक्षात आल्यानंतर या मोहिमेत केवळ पुरवठा खंडित न करता थकबाकीदाराचे विजेचे मीटर व सव्‍‌र्हिस वायर काढून टाकण्याची कारवाई करण्यात आली. थकबाकी भरल्यानंतरच मीटर बसवून दिले जाऊ लागले. त्यानुसार या वर्षांतही ही कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार आहे. त्याबरोबरीनेच महावितरण सुरक्षा व दक्षता विभागाकडूनही अनधिकृत वीजवापर व वीजचोरीबाबत कारवाई करण्यात येत आहे. यासाठी विविध पथके तयार करण्यात आली आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahavitaran may hit to duers in new year