नाशिक जिल्हा ग्राहक पंचायतीची मागणी
पहिल्याच पावसात रविवारी रात्री ते सोमवारी पहाटेपर्यंत शहराच्या अनेक भागांत सुमारे १० ते १८ तास वीज गायब होती. नियमानुसार वीज बंद असणाऱ्या प्रत्येक ग्राहकास महावितरणने प्रति तास ५० रुपये याप्रमाणे भरपाई देण्याची मागणी नाशिक जिल्हा ग्राहक पंचायतीने केली आहे.
२ जूनच्या रात्रीपासून ते ३ जून पहाटेपर्यंत शहरात पाऊस पडला. पावसाळीपूर्व कामे पूर्ण केल्याचा महावितरणचा दावा या पहिल्याच पावसाने फोल ठरविला. शहरात सुमारे १० ते १८ तास वीजपुरवठा बंद राहिला. १० वर्षांपासून पहिला पाऊस पडला की वीजपुरवठा खंडित होतो. विजेअभावी पंप सुरू न झाल्याने नागरिकांना पाणी न मिळणे, इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वापर करता न येणे यासारख्या असुविधाना सामोरे जावे लागते, असे ग्राहक पंचायतीने याआधीच निदर्शनास आणले होते. त्यावर महावितरणच्या मुख्य अभियंत्यांनी यंदा असे प्रकार होणार नाहीत आणि मुंबई-भिवंडीप्रमाणे नाशिक शहरातही वीजपुरवठा सुरळीत राहील, असे आश्वासन दिले होते.
वीज कायदा २००३ भाग ५७ नुसार वीजसेवेला ‘एसओपी’ (सेवेची मानके) लागू असून, त्यानुसार नाशिक शहरात वादळ, पाऊस आदींमुळे वीजपुरवठा बंद झाल्यास आणि वीजपुरवठा सहा तासांत सुरू न झाल्यास प्रति तास प्रति (प्रभावित) ग्राहकास ५० रुपयांप्रमाणे भरपाई द्यावी, असा नियम आहे. सोमवारी सहा तासांपेक्षा अधिक काळ वीजपुरवठा बंद राहिल्याने सेवेच्या मानकांनुसार नाशिक शहरातील वीज बंद असणाऱ्या प्रत्येक ग्राहकास २०० ते ६०० रुपये भरपाई द्यावी, त्याचे अर्ज ग्राहकांनी भरून द्यावेत, असे आवाहन जिल्हा ग्राहक पंचायतीने केले आहे. त्यासाठी अर्ज अंजली स्टोअर्स (कॉलेज रोड), भारत बेकरी (सावरकरनगर), बालाजी हार्डवेअर (जीपीओ), सप्तशृंगी डेअरी (इंदिरानगर) येथे मिळतील, असे ग्राहक पंचायतीचे विलास देवळे, अनिल नांदोडे, सुहासिनी वाघमारे, राहुल पाटील यांनी कळविले आहे.