नागपूर शहर परिमंडळात महावितरणच्या भरारी पथकाने मे महिन्यात वीज चोरांविरोधात राबवलेल्या विशेष मोहिमेत ३३ वीजचोऱ्या उघडकीस आणल्या असून यात ५९ हजार ३३६ युनिटची वीजचोरी झाल्याचे उघडकीस आले. याची अनुमानित रक्कम अंदाजे १० लाख ८४ हजार एवढी असून ४५ वीजचोर ग्राहकांवर कारवाई करण्यात आली आहे. महावितरणच्या नागपूर शहर परिमंडळांतर्गत असलेल्या नागपूर शहर आणि ग्रामीण या दोन्ही मंडळात ही विशेष मोहीम राबवण्यात आली.
या मोहिमेत सिंगल व थ्री फेज वीजपुरवठा असलेल्या घरगुती, व्यापारी व औद्योगिक अशा १४८ ग्राहकांची तपासणी करण्यात आली असून यात विद्युत अधिनियम-२००३च्या कलम १३५ नुसार ३३ तर कलम १२६ नुसार ५ ग्राहकांविरोधात कारवाई करण्यात आली. यातील वीज चोरांविरोधात महावितरणच्या स्वतंत्र पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यात अधिनियम-२००३ च्या कलम १३५ नुसार पांजरा येथील जोगिंदरसिंह पाल यांच्याकडे ६ लाख ५४ हजार २२५ रुपयांची तर रनाळा, कामठी येथील यादवराव डोमाजी तामस्कर यांच्याकडे ४६ हजार २४५ रुपयांची वीजचोरी आढळली. या दोन्ही ठिकाणी वीजमिटरमध्ये फेरफार केल्याचे आढळून आले.
याशिवाय अधिनियम -२००३च्या कलम १२६ नुसार नागपुरातील सीताबर्डी येथील ओमप्रकाश जाजोडीया यांच्याकडे ४६ हजार १३५, सोनेगाव येथील मोहम्मद इसराली हाजी मोहम्मद हनीफ यांच्याकडे ६० हजार १७४ तर धरमपेठ येथील अनुज बडजाते यांच्याकडे २१ हजार ६१३ रुपयांच्या विजेचा अनुमानित गैरप्रकार आढळून आला. तर बिलिंग न झाल्याने महालगाव येथील आनंद सुरेश नाथानी यांना १ लाख ६ हजार ३७७ रुपयांचे वीज वापरापोटीचे देयक देण्यात आले. या मोहिमेत नागपूर शहर मंडळात १६ तर नागपूर ग्रामीण मंडळात एकूण १७ वीजचोऱ्या उघडकीस आल्या. महावितरणच्या दक्षता व सुरक्षा विभागाचे प्रभारी संचालक शिवाजी इंदलकर व नागपूर परिक्षेत्राचे उपसंचालक सुमीत कुमार यांच्या नेतृत्वात राबविण्यात आलेल्या या विशेष मोहिमेत उपकार्यकारी अभियंता ए.ए. खान, आर.एस. मलासमे, बेहरे तसेच कनिष्ठ अभियंता मोटघरे, बोरकर आणि दुय्यम अभियंता टाले, चरपे व कर्मचारी सहभागी झाले होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा