पनवेलमधील प्रवाशांच्या खिशावर दिवसाढवळ्या दरोडे
पनवेलमधील एक राजकीय महायुती खूप गाजली. सध्या गाजत आहे ती रिक्षाचालक, वाहतूक पोलीस, आरटीओ अभद्र महायुती. या महायुतीमुळे पनवेलकरांच्या खिशावर दिवसाढवळ्या दरोडे टाकण्याचे काम रिक्षाचालक करीत आहेत. कधी काळी प्रवाशांनी तक्रार केल्यास प्रामाणिक अधिकाऱ्यांनी या मुजोर रिक्षाचालकांवर कारवाई केल्यास राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांच्या दमबाजीला त्यांना समोरे जावे लागते. वरिष्ठाकडे या अधिकाऱ्यांनी तक्रार केल्यास याच राजकीय पुढाऱ्यांच्या आशीर्वादाने चौकीला वातानुकूलित यंत्रणा बसविण्यात आली असून इतर सुविधा वेळोवेळी प्राप्त होत असल्याने बोटचेपे धोरण घेणाऱ्या वरिष्ठांमुळे प्रामाणिक कर्मचारीदेखील हतबल झाले आहेत.
रिक्षाचालकांकडून होणारी लूट गेली अनेक वर्षे पनवेलकर सहन करत आहेत. प्रशासनाकडे तक्रार केल्यास त्यांनाच सातत्याने फेऱ्या माराव्या लागत असल्याने सर्वसामान्य पनवेलकर शांतपणे ही लूट सहन करत आहेत. रिक्षाचालकांच्या विरोधात आवाज उठविणाऱ्या सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना धमकावण्याचे प्रकारसुद्धा यापूर्वी अनुभवायला मिळाले. पनवेल रेल्वेस्थानकापासून शिवाजी चौकात येण्यासाठी २० ते ३० रुपये प्रवाशांकडून आकारले जातात. महत्त्वाचे म्हणजे सर्व रिक्षाचालकांनी मीटर डाऊन केले आहेत. मात्र भाडे अवाच्या सव्वा आकारले जाते. या संदर्भात एखाद्या प्रवाशाने त्या ठिकाणी असलेल्या वाहतूक पोलिसाला तक्रार केल्यास मीटर टाकला आहे ना असा उलट प्रश्न प्रवाशांना केला जातो. त्यामुळे नाइलाजाने रिक्षा चालक मागत असलेली भाडेरूपी खंडणी प्रवाशांना मोजावी लागते. सध्या रेल्वे स्थानक आणि एसटी स्थानकामध्ये ‘आरटीओने लावलेल्या मीटरप्रमाणे भाडे द्या’ हा सूचना फलक वाचल्यावर प्रवाशांना हसावे की रडावे अशी अवस्था झाली आहे. यापूर्वी आलेल्या तक्रारींवर आरटीओ प्रशासनाने काय कारवाई केली याची माहिती त्यांनी जाहीर करावी अशी मागणी त्यांच्याकडून होत आहे. त्याचप्रमाणे तक्रार केल्यास त्याच्यावरील कारवाईची निश्चित कालावधीचे फलक प्रशासनाने लावून कारवाईमधील पारदर्शकता निर्माण करावी अशी भावनादेखील पनवेलकरांमधून व्यक्त होत आहे.
रिक्षाचालकांनी मीटरप्रमाणे भाडे आकारणे गरजेचे आहे, मात्र नियमाप्रमाणे भाडे आकारले जात नाही. प्रवाशांनी मोठय़ा प्रमाणात तक्रारीसाठीपुढे यावे. या प्रकरणी न्यायालयात दाद मागण्याच्या तयारीत आम्ही आहोत.
-अरुण भिसे, सदस्य, कफ