आगरी समाज भवनाची बांधणी..मलनिस्सारण योजनेची अंमलबजावणी, उद्यानांची उभारणी, ‘टीएमटी’चा कायापालट. महापालिका निवडणुक लढविणाऱ्या एखाद्या उमेदवाराच्या जाहीरनाम्यात ही आश्वासने उठून दिसली असती. मात्र, दिल्लीचे विमान पकडण्याच्या तयारीला लागलेले शिवसेना-भाजप युतीचे ठाण्यातील उमेदवार राजन विचारे मनाने अजूनही कसे गल्लीत आहेत, याचे प्रत्यंतर घडविणारा जाहीरनामा महायुतीने नुकताच जाहीर केला आहे. ठाणे, मीरा-भाईंदर शहरात नाटय़गृहाची उभारणी, अतिरीक्त पाण्याची सोय उपलब्ध करुन देणे, कळव्यात नवा पूल बांधणे अशास्वरुपाची महापालिका निवडणुकीत शोभून दिसतील, अशी आश्वासने विचारे यांनी मतदारांपुढे ठेवली असून ही कामे कशी करणार, त्याचे नियोजन काय, याचा कोणताही ठोस खुलासा यामध्ये नाही. विशेष म्हणजे, गल्लीतील समस्या सोडविणारी जी आश्वासने विचारे यांनी दिली आहेत, त्यापैकी बहुतांश कामांचे प्रस्ताव महापालिकेत यापूर्वीच मंजूर झाले असून त्यामुळे निवडून आले तरी विचारे नवे काय करणार, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
लोकसभा निवडणूकीचा प्रचार ऐन रंगात आला असताना ठाण्यातून निवडणूकीला सामोर जाणाऱ्या राजकिय पक्षाच्या उमेदवारांनी आपले वचननामे मतदारांसमोर ठेवण्यास सुरुवात केली आहे. या मतदारसंघात रेल्वे वाहतूकीचा मुद्दा अतिशय ज्वलंत असल्याने सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी ठाणे स्थानकाचा कायापालट करणे, नवे स्थानक उभे करणे, अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करुन देणे अशी नेहमीचीच आश्वासने आपल्या जाहीरनाम्यात दिली असली तरी आमदार राजन विचारे यांनी मात्र नगरसेवकांना शोभतील, अशा आश्वासनांचा रतीब मांडत मतदारांना आतापासूनच बुचकळ्यात पाडले आहे. खासदार पदाच्या निवडणूकीस सामोरे जाणाऱ्या उमेदवाराकडून पर्यावरण, रेल्वे, नगरविकास, महामार्ग, आरोग्य, जलवाहतुक, शिक्षण, उद्योगधंदे, रोजगार यासारख्या प्रश्नांवरील ठोस भूमीकेची आवश्यकता असताना विचारे यांचा जाहीरनाम्यात उद्यान, स्मारके, पार्किंगप्लाझा, रस्ते, गटारे, पायवाटा यासारख्या मुद्दय़ांनाच महत्व दिले आहे.
ठाण्यातील मतदार मोठय़ा संख्येने रेल्वेने प्रवास करत असताना रेल्वे विषयक चांगल्या सेवेच्या भरीव आणि माहितीपुर्ण वचनांची गरज असताना शिवसेनेचा वचननामा केवळ आत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देणे, मेंटल हॉस्पिटलच्या जागेवर अद्यावत रेल्वे स्थानक उपलब्ध करून देणे या जुन्याच मुद्दय़ांच्या भोवती फिरत आहे. ठाण्यातील विद्यार्थाना चांगल्या दर्जाचे शिक्षण उपलब्ध व्हावे, अभियांत्रिकी प्रशिक्षणा संदर्भात कोणतेही अश्वासन या वचननाम्यात नाही. आरोग्याचा अत्यंत गंभीर विषयाचा साधा उल्लेख देखील या वचननाम्यात करण्यात आलेला नाही.
ठाणे महापालिकेच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या कामांची जणू जंत्री या वचननाम्यात आहे. त्यामध्ये ठाणे स्टेशनबाहेर दुचाकी गाडय़ांसाठी पार्किंग प्लाझा, परिवहन सेवा सुधारणे, कळवा ब्रीज बांधणे, वाहतुक व्यवस्था सुधारणे, भुयारी मार्गाची निर्मिती, बसेस, ऑटोरिक्षा व टॅक्सीसाठी टर्मिनल स्टेशन, वॉटर पार्क, मल निस:रण, थीम पार्क, गार्डन, समाज मंदिर, कृत्रीम प्रस्त्रारोहण भिंती, विज्ञानपार्क, सिटी थीम पार्क आणि क्लस्टर डेव्हलपमेंट योजना अशा मुद्दय़ांचा समावेश ठाण्याच्या वचननाम्यात आहे. तर मीरा भाईंदरमध्ये सरकते जिने, नाटय़गृह, रस्ते, गटारे, पायवाटा, उद्याने, तरण तलावाचे अश्वासने देण्यात आली आहे. नवी मुंबईसाठी भूमिपुत्रांचा रोजगार, औद्योगिक विकास, मागासवर्गीय विद्यार्थाना शिष्यवृत्ती, ज्येष्ठ नागरिकांसाठी सोयी, अशा मुद्दय़ांचा समावेश आहे. मेट्रो रेल्वेसाठीचा प्रयत्न, नियोजित विमानतळाच्या उभारणीसाठी गती देण्याची वचने या जाहीरनाम्यात असली तरी गल्लीतील मुद्दयांमध्ये ती हरवून गेली आहेत. यासंबंधी राजन विचारे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपला जाहीरनामा सर्वसमावेशक असल्याचा दावा केला. तसेच दिल्लीपासून गल्लीपर्यतच्या सर्व मुद्दयांना स्पर्श करुन सर्वसामान्यांचे राहणीमान सुखकर करण्याचा प्रयत्न असल्याचा दावाही त्यांनी केला.
महायुतीच्या वचननाम्यात गटारे, पायवाटा बनविण्याची आश्वासने
आगरी समाज भवनाची बांधणी..मलनिस्सारण योजनेची अंमलबजावणी, उद्यानांची उभारणी, ‘टीएमटी’चा कायापालट.
First published on: 17-04-2014 at 09:33 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahayuti manfisto