राष्ट्रवादीचे नेते मला मतदारसंघात अडकवण्याची भाषा करीत आहेत. मात्र, पवार काका-पुतण्यालाच बीडमध्ये अडकवून मी राज्यभर प्रचार करणार आहे. राष्ट्रवादीला या वेळी चारपेक्षा जास्त जागा मिळू देणार नाही, असा दावा करून टोलमुक्ती, कापूस, सोयाबीन, तसेच अजित पवार यांच्या वीजकपात मुक्तीच्या फसव्या घोषणेबाबत महाएल्गार मेळाव्यात भूमिका मांडणार आहे, असे खासदार गोपीनाथ मुंडे यांनी सांगितले.
महायुतीचा महाएल्गार मेळावा उद्या (रविवारी) सायंकाळी येथे होत आहे. मेळाव्याच्या तयारीचा आढावा घेतल्यानंतर शनिवारी पत्रकार बैठकीत बोलताना मुंडे यांनी, मेळाव्यापूर्वी महायुती समन्वय समितीची बठक होऊन महत्त्वपूर्ण राजकीय निर्णयांची माहिती दिली जाणार आहे. त्यामुळे या मेळाव्याकडे राज्याचे लक्ष लागले आहे, असे स्पष्ट केले.
बीड जिल्हा सार्वत्रिक निवडणुकांची युद्धभूमी झाला असून, एल्गार मेळाव्यानंतर मराठवाडय़ात युतीला अधिक पोषक वातावरण तयार होईल. शिवसेनेचे उद्धव ठाकरे, रिपाइंचे रामदास आठवले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, रासपचे महादेव जानकर या वेळी उपस्थित राहणार आहेत. सोयाबीन, कापूस पिकांना मिळणारा भाव, राज्यातील टोलमुक्ती धोरणाबाबत आपण भूमिका मांडणार आहोत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही वर्षांपूर्वी बीड जिल्हा दत्तक घेऊन वीजकपात मुक्ती, विकासनिधी देण्याची घोषणा केली होती. परंतु प्रत्यक्षात राज्यात सर्वाधिक वीजकपात बीड जिल्हय़ात होत आहे. दहा तासांपेक्षा जास्त वीज नाही. रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. या बाबत मी जाब विचारणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस दोन वर्षांपासून आपल्याविरुद्ध सक्षम उमेदवाराचा शोध घेत असली, तरी कोणीच निवडणूक लढवण्यास पुढे येत नाही. मतदारसंघात आपल्याला अडकवून ठेवण्याची भाषा केली जाते. मात्र, जिल्हय़ातील एकाही स्थानिक नेत्यामध्ये आपल्याला अडवण्याची क्षमता नाही. राष्ट्रवादीच्या पवार काका-पुतण्यालाच बीडमध्ये तळ ठोकावा लागेल. जिल्हय़ातील स्वाभिमानी जनता आपल्याबरोबर असल्यामुळे पवारांनाच बीडमध्ये अडकवून ठेवून राज्यातील सर्व मतदारसंघांत आपण प्रचाराला जाणार आहोत. राष्ट्रवादीला चारपेक्षा जास्त जागा मिळूच देणार नाही, असा इशाराही मुंडे यांनी दिला.
माढा मतदारसंघावरून महायुतीतील जानकर नाराज असल्याच्या प्रश्नावर मुंडे म्हणाले, की जागावाटप समितीत स्वत: जानकर आहेत. सर्वाच्या संमतीने निर्णय घेतला जाईल. आठवले यांनाही खासदार करणार का? या बाबत चर्चा होती. पण भाजपने आपली जागा सोडून आठवलेंना खासदार केले. त्याच पद्धतीने माढय़ाचा प्रश्नही सर्वाना विश्वासात घेऊन सोडवला जाईल. कोणीही नाराज होणार नाही. सर्व घटक पक्षांना सत्ता आल्यास सन्मानाची वागणूक दिली जाणार असल्याचे मुंडे यांनी स्पष्ट केले.