राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारविरुध्द प्रचंड जनक्षोम असून दिल्लीपासून गल्लीपर्यंत काँग्रेसविरोधी प्रचंड लाट उसळली आहे. दुसरीकडे महायुतीत स्वाभिमानी संघटना सामील झाली असून लवकरच राष्ट्रीय समाज पक्ष सामील होण्याच्या उंबरठय़ावर आहेत. त्यामुळे महायुतीची ताकद प्रचंड वाढल्याने २०१४च्या विधानसभा निवडणुकीत महायुती सत्तेवर येईल, असा ठाम विश्वास महायुतीचे नेते व रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी मंगळवारी यवतमाळ येथे व्यक्त केला.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीने प्रचंड यश मिळविले असले तरी भाजपच्या मतांवर त्याचा परिणाम झालेला नाही. उलट, काँग्रेसच्या विरोधात लोकांनी आपच्या उमेदवारांना निवडून दिले. काँग्रेसने केलेला भ्रष्टाचार व महागाईमुळे देशातील जनता संतप्त असून राज्यातही काँग्रेसविरोधात जनक्षोभ भडकत आहे. त्यामुळे महायुतीला विधानसभा निवडणुकीत निशिचतपणे प्रचंड यश मिळेल व ही युती सत्तेवर येईल, याबाबत दुमत नसल्याचे आठवले यांनी सांगितले.
विदर्भ राज्याबाबत महायुतीत मतभेद असले तरी विदर्भाच्या विकासासाठी महायुतीच्या जाहीरनाम्यात ठोस कार्यक्रम असावा, अशी आमची आग्रही मागणी आहे. ती या बैठकीतही मांडण्यात येईल. पक्षाने लोकसभेच्या ७ जागांचा प्रस्ताव महायुतीकडे ठेवला आहे. त्यात विदर्भातील रामटेक व वर्धा, दक्षिण मध्य मुंबई, कल्याण, ठाणे, लातूर, सातारा व पुणे आदींचा समावेश आहे. यातील ३ जागा आम्हाला सोडाव्या, अशी पक्षाची मागणी असल्याचे ते म्हणाले.
पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नरेंद्र मोदी हे सक्षम उमेदवार आहेत. त्या तुलनेत राहुल गांधी सक्षम नेता नाही. त्यांना फारसा अनुभव नाही, असे त्यांनी सांगितले. गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी शरद पवार पंतप्रधान व्हावे, असे सुचविले आहे. २००४ मध्ये आपणही राष्ट्रवादीत विलीन होऊन शरद पवारांनी किमान दोन वर्षांसाठी पंतप्रधानपद मागावे, असा प्रस्ताव आपण त्यावेळी खुद्द पवारसाहेबांसमोर ठेवल्याचे त्यांनी सांगितले.
गरीब व भूमिहीनांना किमान पाच एकर जमीन द्यावी, अशी पक्षाची भूमिका आहे. यासाठी गायरान जमीन व झुडपी जंगली जमिनीचा वापर करावा व तसे राज्याचे नियोजन करावे, अशी मागणी त्यांनी यावेळी बोलून दाखविली.
येत्या २२ फेब्रुवारीला याच अनुषंगाने भूमिहीन व भूमिहक्क परिषद यवतमाळातील आझाद मैदानात पक्षाच्या वतीने घेण्यात येणार असल्याची घोषणा आठवलेंनी यावेळी केली. देवयानी खोब्रागडे प्रकरणी संपूर्ण भारत तिच्या पाठीमागे उभा राहिला, ही अभिमानाची बाब असल्याचे सांगून रिपाइं लवकरच देवयानीचा जंगी सत्कार करेल, असे सांगून रिपाइंने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ओबामा यांना याप्रकरणी आवर्जुन लक्ष घालण्यासाठी त्यांच्या भेटीची वेळ मागितली असल्याचे आठवले म्हणाले. राज्यात सध्या सुरू असलेल्या टोल प्रकरणी सरकारने रोखठोक भूमिका घ्यावी. रस्ते चांगले असावे, असा सरकारचा आग्रह असावा, यासाठी परकीय तंत्रज्ञानाची सेवा घेण्याबाबत विचार व्हावा, असे आठवलेंनी सांगितले.
.. तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील
आगामी निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर रिपाइं आठवले गट भाजपा-शिवसेना-स्वाभिमान शेतकरी पक्ष या महायुतीच्या आयोजित घाटंजी येथील मेळाव्यात काँग्रेस सरकारवर घणाघाती टीका करून २०१४ च्या निवडणुकीत महायुती सत्तेवर आल्यास या जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवू, असे आठवले म्हणाले. घोटाळेबाज काँग्रेस सरकारने देश देशोधडीला लावला असून गरीब जनतेला दोन वेळेचे अन्न मिळणे कठीण झाले आहे, तर काँग्रेस सरकारमधील मंत्री भ्रष्टाचार करण्यात गुंतले असल्याचा आरोप करून खासदार हंसराज अहीर म्हणाले, कोळसा घोटाळा उघडकीस आणण्यास यश मिळाले आहे. सिंचनासारख्या बाबतीत पंजाब, हरियाणासह महाराष्ट्राची तुलना करा, या सरकारच्या काळात प्रत्येक प्रकल्प अर्धवट आहे. असे एक ना अनेक समस्या काँग्रेस सरकारच्या काळात निर्माण झाल्या असून या सरकारला जनता वैतागली आहे. यावेळी रामदास आठवले यांची लाडुतुला करण्यात आली. यावेळी रिपाइं आठवले गट, भाजप-शिवसेनेचे तालुक्यातील हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.

Story img Loader