उपनगरी रेल्वे स्थानकांवर बसविण्यात आलेल्या एटीव्हीएम मशीन्समध्ये आता मेल-एक्स्प्रेस गाडय़ांचेही अनारक्षित तिकीट मिळणार आहे. यामुळे शेवटच्या क्षणी तिकीट काढणाऱ्या प्रवाशांची तिकीटाच्या रांगेत उभे राहिल्यामुळे गाडी चुकणार नाही. मुंबईतून दररोज विविध मेल-एक्स्प्रेस गाडय़ांतून अनारक्षित तिकीट काढून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या सुमारे ५० हजार आहे. या प्रवाशांपैकी अनेकजण आयत्यावेळी धावतपळत येऊन तिकीट काढणारे असतात. या प्रवाशांना वेळेत तिकीट मिळावे यासाठी मध्य रेल्वेने एटीव्हीएम मशीन्सवरच मेल-एक्स्प्रेस गाडय़ांचे तिकीट देण्याची योजना आखली असून तसे तांत्रिक बदल या मशीन्समध्ये करण्यात येत आहेत. छत्रपती शिवाजी टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे आणि कल्याण या स्थानकांवरील एटीव्हीएम मशीन्समधील सॉफ्टवेअरमध्ये याबाबतचे बदल करण्याचे काम सध्या सुरू असल्याचे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. ज्या ठिकाणाहून मेल-एक्स्प्रेस सुटते आणि जेथे पोहोचते अशाच स्थानकांवर सध्या ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सध्या केवळ १५ मशीन्सवर ही सुविधा असून पुढील काही महिन्यांमध्ये २५० मशीन्सवर ही सुविधा सुरू करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
कशी असेल सुविधा!
एटीव्हीएमवर आपले कार्ड ठेवल्यावर लोकल (सबर्बन) मेल-एक्स्प्रेस (नॉन सबर्बन) असे दोन पर्याय येतील. नॉन सबर्बन असा पर्याय निवडल्यावर संबंधित गाडीचे नाव दिसेल आणि पुढे त्या गाडीच्या थांब्यांची नावे दिसतील. आपण त्यापैकी नाव निवडून ओके या चौकोनावर आपले बोट ठेवले की लगेच तिकीट मिळेल.   

Story img Loader