आखाती देशातील बडय़ा कंपनीत मोठय़ा हुद्दय़ावर काम करणाऱ्या मायकल फर्नाडिसशी मुंबईतील मध्यमवर्गीय रोझी सेल्वनचा (नावे बदलली आहेत) विवाह ठरला. मुंबईत येऊन त्याने तिला पाहिले आणि भावी जीवनाबद्दल दोघांनी आणाभाकाही घेतल्या. पण मायकलच्या जी-मेलवर रोझीची बदनामी करणारा एक मेल आला आणि दोघांनी पाहिलेले स्वप्न भंगले. आपली बदनामी करणाऱ्याचा शोध घेण्यासाठी रोझीने सायबर गुन्हे विभागात धाव घेतली. पण अत्यंत वेगाने सायबर गुन्हे उघडकीस आणण्याचा दावा करणाऱ्या या विभागाला या मेलची उकल करता आलेली नाही. या मेलचे गूढ अद्याप कायम असल्याने रोझीचे विवाहाचे स्वप्न धूसर बनले  आहे.
माहीममध्ये आई, वडिल आणि भावासोबत राहणाऱ्या रोझीच्या विवाहासाठी तिच्या एका नातेवाईकाने सिंगापूरमध्ये मोठय़ा कंपनीमध्ये व्यवस्थापक पदावर काम करणाऱ्या मायकलचा प्रस्ताव सुचविला. रोझी आणि तिच्या आई-वडिलांची मायकलच्या मुंबईतील आई-वडिलांशी भेटही घडवून आणली. मायकलचा फोटो पाहून रोझीही हरखून गेली. मायकलला रोझीचे छायाचित्र ई-मेलद्वारे पाठविण्यात आले. त्यालाही ती पसंत पडली आणि भावी पत्नीच्या ओढीने तो मुंबईत दाखल झाला. एक आठवडय़ासाठी आलेला मायकल रोझीच्या ओढीने तब्बल एक महिना मुंबईतच होता. सिंगापूरमध्ये परतल्यानंतरही दोघांमध्ये मोबाइलवरुन संवाद होत होता. मायकलच्या सांगण्यावरुन रोझीने बडय़ा कंपनीतील लठ्ठ पगाराची नोकरीही सोडून दिली. त्याच्या आवडीनिवडीनुसार तिने आपल्या दिनचर्येत बदलही केले. मात्र काही महिन्यांनी मायकल तुटक बोलू लागला. रोझीने खोदून विचारल्यानंतर आपल्याला एक ई-मेल आल्याचे त्याने तिला सांगितले. या ई-मेलमध्ये रोझीची बदनामी करण्यात आली होती. ई-मेलमध्ये केलेले आरोप खोटे असल्याचे सिद्ध कर, मी तुझ्याबरोबर विवाह करायला तयार आहे, असा तगादा त्याने तिच्यामागे लावला. हळूहळू तो तिचा दूरध्वनी उचलेनासा झाला आणि आता तर दोघांमधील संवाद संपुष्टात आला आहे.
आपले जीवन उद्ध्वस्त करणाऱ्याचा शोध घेण्याचा निश्चय रोझीने केला आणि तिने थेट वांद्रे-कुर्ला संकुलातील सायबर गुन्हे विभाग गाठला. रीतसर अर्ज देऊन तिने या ई-मेलचा शोध घेण्याची विनंती सायबर गुन्हे विभागातील अधिकाऱ्यांना केली. त्यानंतर सलग दोन-तीन महिने रोझी आणि तिचे आई-वडिल सतत या अधिकाऱ्यांची भेट घेत होते. तुम्ही सतत येऊ नका, शोध लागल्यावर आम्ही कळवू, असे सांगून या अधिकाऱ्याने रोझीच्या सायबर गुन्हे विभागातील खेटय़ांना पूर्णविराम दिला. त्यानंतर या विभागाने हे प्रकरण माहीम पोलीस ठाण्याकडे पाठवून दिले आणि त्याची माहिती रोझीला दिली. माहीम पोलीस ठाण्यातही रोझीला हाच अनुभव आला. विदेशात नोकरी करणाऱ्याला हा ई-मेल आल्यामुळे आम्हाला त्याचा शोध घेणे अवघड बनल्याचे सांगत पोलिसांनी तिची बोळवण केली.
ई-मेलवरुन आपल्यावर अविश्वास दाखविणाऱ्या मायकलबरोबर विवाह करायचा नाही असा निश्चय रोझीने केला आहे. मात्र आपले आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्याचा चंग तिने बांधला आहे. मात्र विदेशातून होणाऱ्या ऑनलाइन गुन्ह्य़ांची उकल करणाऱ्या सायबर गुन्हे विभागाला मात्र या प्रकरणाचा छडा लावता आलेला नाही. त्यामुळे रोझी हतबल झाली आहे. आता न्याय कुठे मागायचा असा प्रश्न तिला पडला आहे.

Story img Loader