दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची तयारी करणाऱ्या शिवसेना नेते मनोहर जोशी यांना आता ‘हाताची घडी तोंडावर बोट’ ठेवून बसण्याचे ‘आदेश’ सेना नेत्यांकडून देण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्याचवेळी स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांच्याबरोबर दादरमधील काही जागांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव यांनी भेट दिल्यामुळे जोशीसरांचा पत्ता कापला गेल्याचे संकेत मिळत आहेत. मनोहर जोशी यांची ज्याप्रकारे मुस्कटदाबी केली जात आहे त्यामुळे काही ज्येष्ठ शिवसैनिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेनंतर विधानसभा निवडणुकीच्यावेळी राज यांचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन ज्येष्ठ शिवसैनिकांना महत्त्व देण्यात आले होते. ज्येष्ठ शिवसैनिकांसाठी सेना नेतृत्वाकडून काही मेळाव्यांचे आयोजनही करण्यात आले होते. राज्याचे मुख्यमंत्रीपद व लोकसभेचे अध्यक्षपद भूषविलेल्या मनोहर जोशी यांना सध्या पक्षात जी वागणूक मिळत आहे, ती अस्वस्थ करणारी असल्याचे काही ज्येष्ठ शिवसैनिकांचे म्हणणे आहे.
तरुणांना वाव मिळाला पाहिजे, हे मान्य केले तरी एकाच व्यक्तीला चौथ्यांदा स्थायी समिती अध्यक्षपद का दिले जाते, असा सवाल करून पालिकेत अन्य कोणी लायक नगरसेवक अथवा नगरसेविका नाही का, असा सवालही या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. शिवसेनाप्रमुखांनी जोशीसरांना शेवटपर्यंत महत्त्व दिले याचाही आज विसर पडलेला दिसतो. अन्यथा दादरमध्ये गणेशोत्सवानिमित्त सरांचे होर्डिग्जवर साधे नावही न टाकण्याचा कद्रुपणा दाखविणाऱ्या राहुल शेवाळे यांच्यावर काहीतरी कारवाई झाली असती, असेही मत व्यक्त करण्यात येत आहे. नव्यांना संधी देताना त्यांच्याकडून मागील पिढीतील सेनानेत्यांची अवहेलना पक्षनेतृत्वाला मान्य आहे का, असा सवालही यानिमित्ताने उपस्थित होताना दिसतो. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा