समाजाच्या विविध क्षेत्रात निस्वार्थपणे काम करणाऱ्या व्यक्तींचा मैत्री परिवारतर्फे दरवर्षी सन्मान केला जात असून या वर्षीचा मैत्री गौरव पुरस्कार ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक आणि संस्कार भारतीचे अखिल भारतीय माजी अध्यक्ष राजदत्त यांना जाहीर करण्यात आला आहे. पुरस्कार प्रदान समारंभ २५ डिसेंबरला सायंकाळी ५.३० वाजता शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात आयोजित करण्यात आला असल्याची माहिती संस्थेचे सचिव प्रा. प्रमोद पेंडके यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या कार्यक्रमात समाजसेवक जगदीश खरे, दीपक वालदे, वृद्धांची सेवा करणारे डॉ. शशिकांत रामटेके, अभय कोलारकर, निरंजन अभ्यंकर, गायक सुनील वाघमारे आणि ताराबाई चरडे यांचाही मैत्री गौरव पुरस्कार देऊन सत्कार करण्यात येणार आहे. याशिवाय पोलीस दलातील संजय पुरंदरे, रेखा कावडकर, प्रज्ञा वासनिक यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
गुरुदेव सेवाश्रमचे नांदुऱ्याचे आचार्य हरिभाऊ वेरुळकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमाला वरोऱ्यातील आनंदवन महाविद्यालयाचे प्राचार्य मधुकर उपलेंचवार उपस्थित राहणार आहेत. पुरस्कार प्रदान समारंभानंतर सुगम संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात पुण्याच्या स्वरश्री संस्थेचे कलाकार सुवर्णा माटेगावकर आणि धवल चांदवडकर मराठी-हिंदी गीते सादर करणार आहेत. मैत्री परिवाराने यापूर्वी अनेक सामाजिक उपक्रम राबविले असल्याचे पेंडके यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला संजय भेंडे, अनुप सगदेव, विजय शहाकार, संजय नखाते उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा