गेल्या तीन महिन्यांपासून जिल्हा प्रशासनाने वाळू घाटातील उपशावर बंदी घातली आहे. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील बांधकामे बंद पडली आहेत. परिणामी, यावर उपजिविका करणारे मिस्त्री व मजूरांवर ऐन सणासुदीच्या दिवसात उपासमारीची पाळी आली आहे. मजूरांची हेळसांड थांबविण्यासाठी जिल्ह्य़ातील वाळू घाटाचा लिलाव तात्काळ करण्यात यावा, पन्नास वर्षे झालेल्या मिस्त्री व मजूरांना दोन हजार रुपये पेंशन देण्यात यावी, त्यांच्या मुलांना शैक्षणिक संस्थेत मोफत प्रवेश देण्यात यावा, इतर मागण्यांसाठी सोमवारी मजदूर संघटनेच्या वतीने येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चाचे नेतृत्व मजदूर संघटनेचे जिल्हाध्यक्ष मधुकर जोगदंड यांनी केले. शहरातील जयस्तंभ चौकातून या मोर्चाची सुरुवात करण्यात आली. हा मोर्चा पोलीस ठाणे, बाजार लाईन, जनता चौक, कारंजा चौक, भोंडे सरकार चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला. यात शहरासह ग्रामीण भागातील शेकडो बांधकाम मिस्त्री व मजूर सहभागी झाले होते. या दरम्यान वाळू घाटाचा लिलाव करा, मजूरांच्या हाताला काम द्या, अशा घोषणा देऊन कार्यकर्त्यांनी शहर दणाणून सोडले. जिल्हाधिकारी कार्यालयावर येताच मोर्चाचे जाहीरसभेत रूपांतर झाले.
यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जोगदंड यांनी मोर्चेकऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर मोर्चाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्यात गेल्या १ ऑगस्टपासून जिल्हा प्रशासनाने जिल्ह्य़ातील नदीनाल्यातील घाटातील वाळू उपशावर बंदी घातली आहे. वाळू बंदीमुळे अनेक बांधकामे बंद पडली आहेत.
शहर व परिसरातील शेकडो मिस्त्री व मजूरांचा यावर उदरनिर्वाह चालतो. परंतु तीन महिन्यापासून बांधकाम बंद असल्यामुळे त्यांच्या कुटूंबावर ऐन सणासुदीच्या दिवसामध्ये उपासमारीची पाळी आली आहे. हाताला काम नसल्यामुळे कुटूंबाचा उदरनिर्वाह करणे त्यांना कठीण झाले आहे. मुलाबाळांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
या मोर्चात अभियंता जयंत सोनोने, सुरेश चौधरी, प्रफुल्ल नारखेडे, किशोर पाटील, धनंजय देशपांडे, बांधकाम ठेकेदार पुंजाजी अवचार, सईद ठेकेदार, मुकेश रेड्डी, रूपेश रेड्डी, भीमराव गवई, रमेश धनवे, गौतम मोरे, संजय येरले, सुरज लाडगे, पिंटू पानकर, गुलाब जाधव, शिवाजी उबाळे, संतोष खिल्लारे, शेख नासिर शेख शौकत, शेख शकील शेख कदिर, तमिज मिर्झा, ज्ञानेश्वर तळेकर, दिनेश शर्मा, भास्कर झिने यांच्यासह शहर व परिसरातील शेकडो मिस्त्री व मजूर सहभागी झाले होते.