समृद्ध परंपरेचा वारसा मिरवत त्या रस्त्यावर उतरल्या की आजुबाजूच्या नजरा त्यांच्याकडे वळतात आणि मग तिथेच खिळतात. ‘जुने ते सोने’ हा वाक् प्रचार तंतोतंत लागू पडणाऱ्या या दिमाखदार, राजेशाही कारचे दर्शन पुन्हा एकदा सामान्य मुंबईकरांना होणार आहे ते येत्या रविवारी, ९ मार्च रोजी. फोर्ट येथील हॉर्निमन सर्कल येथून सकाळी आठ वाजता व्हिंटेज कार रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
कार ही आता सर्वसामान्यांच्या आवाक्यात आली आहे. नॅनोपासून मर्सिडीजपर्यंतच्या गाडय़ांची चर्चा करताना सामान्यांची जीभ कचरत नाही. दर आठवडय़ाला येणाऱ्या नव्या मॉडेलची चर्चा लोकलच्या गर्दीतही रंगलेली असते. पण तरीही जुन्या जमान्यातील राजेशाही वारसा सांगणाऱ्या कारची बात काही औरच.. जुन्या ब्लॅक अॅण्ड व्हाइट सिनेमातून दिसलेल्या या गाडय़ांचे मॉडेल, रंग आणि त्यांच्या मालकांनी ठेवलेली बडदास्त यामुळे त्या आजही चर्चेचा विषय ठरतात. अशाच शंभरहून अधिक गाडय़ा रविवारच्या रॅलीमध्ये सहभागी होत आहेत.
‘व्हिंटेज अॅण्ड क्लासिक कार क्लब ऑफ इंडिया’ने आयोजित केलेल्या या रॅलीमध्ये जुन्या गाडय़ा जीवापाड सांभाळणारे अनेक दिग्गज सहभागी होत आहेत. इंडियन एक्प्रेस समूहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विवेक गोयंका आणि होरमुसजी कामा हे त्यांच्याकडील कारचा ताफा घेऊन ‘कॉन्कर्स द एलिगन्स’ किताब जिंकण्यासाठी स्पर्धा करणार आहेत. जगदीश ठाकरसीही त्यांच्याकडील १९३४ ची बेन्टली ड्रॉफेड घेऊन या लढतीसाठी सज्ज झाले आहेत.
गुरगावचे मदन मोहन हे व्हिंटेज कारचे संग्राहकही सहभागी होत आहेत. याच रॅलीमध्ये दुबईहून शेवंती पारेख १९८४ ची रोल्स राइस घेऊन येणार आहेत. देशविदेशाहून येत असलेल्या या राजेशाही कारचा ताफा रविवारही सकाळ अधिकच मौल्यवान करेल, एवढे निश्चित.
राजेशाही मिरवणूक..
राजेशाही कारचे दर्शन पुन्हा एकदा सामान्य मुंबईकरांना होणार आहे ते येत्या रविवारी, ९ मार्च रोजी. फोर्ट येथील हॉर्निमन सर्कल येथून सकाळी आठ वाजता व्हिंटेज कार रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
First published on: 08-03-2014 at 01:01 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Majestic procession of wintage cars