नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी तीन प्रमुख पक्षांचे उमेदवार शुक्रवारी एकाच दिवशी शक्तिप्रदर्शन करून अर्ज दाखल करणार असल्यामुळे खऱ्या अर्थाने रणधुमाळी उडणार आहे. यामुळे निर्माण झालेल्या पेचावर तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकारी व पोलीस यंत्रणा कार्यप्रवण झाली आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये व वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून प्रत्येक पक्षाच्या फेरीला परवानगी देताना स्वतंत्र मार्ग आणि वेगळी वेळ दिली जाणार आहे. या संदर्भात मंगळवारी राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसमवेत प्राथमिक चर्चा झाल्यानंतर बुधवारी अंतिम तोडगा काढला जाणार आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर काँग्रेस आघाडी, महायुती व मनसे या तिन्ही प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज भरण्यासाठी शुक्रवारचा मुहूर्त निश्चित केला आहे. अर्ज दाखल करताना संबंधितांकडून फेरीद्वारे शक्तिप्रदर्शन केले जाणार असल्याने पोलीस यंत्रणेची डोकेदुखी वाढली आहे. एकाच दिवशी व एकाच कालावधीत निघणाऱ्या फेऱ्यांमुळे शहरातील अंतर्गत वाहतुकीचा बोजवारा उडेल, शिवाय समोरासमोर येणाऱ्या फेऱ्यांमुळे घोषणाबाजी व तत्सम प्रकारही घडू शकतात. हे लक्षात घेत प्रत्येक पक्षाच्या फेरीला परवानगी देताना यंत्रणेने सावधानता बाळगली आहे. या पाश्र्वभूमीवर मंगळवारी जिल्हाधिकारी विलास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस आयुक्त कुलवंत कुमार सरंगल आणि राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या वेळी मनसेचे आ. वसंत गिते, महापौर अ‍ॅड. यतीन वाघ, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे नगरसेवक सचिन महाजन, शिवसेनेतर्फे अजय बोरस्ते उपस्थित होते.
शिवसेनेला आपल्या उमेदवाराचा अर्ज दाखल करण्यासाठी शालिमार येथील कार्यालयापासून फेरी काढायची आहे. मनसेने त्र्यंबक रस्त्यावरील राजगड कार्यालयापासून फेरी काढताना ती मेनरोडवर नेण्यास परवानगी मागितली आहे. काँग्रेस आघाडीची फेरी महात्मा गांधी रस्त्यावरील काँग्रेस कार्यालयापासून काढण्यात येणार आहे. या सर्व पक्षांची फेरी महात्मा गांधी या रस्त्यावरून मार्गक्रमण करणार असल्याने आणि शहरातील इतर काही भागांत त्या समोरासमोर येण्याची शक्यता असल्याने प्रत्येक पक्षाला फेरी काढण्यासाठी स्वतंत्र मार्ग देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला, परंतु मनसेने मेनरोडवर फेरी नेण्याची मागणी लावून धरली. तथापि, त्या रस्त्यावर दुरुस्तीची कामे सुरू असल्याने त्या ठिकाणी कोणत्याही पक्षाला फेरी नेता येणार नाही, असे जिल्हा निवडणूक शाखेने स्पष्ट केले. या वेळी मनसेने पक्षाच्या पंचवटी कार्यालयापासून फेरी काढण्याचा प्रस्ताव मांडल्याचे सांगितले जाते. या वेळी तिन्ही राजकीय पक्षांना पोलीस यंत्रणा स्वतंत्र मार्ग देऊन फेरी काढण्यास परवानगी देतील असे सांगण्यात आले. तसेच या सर्व फेऱ्या अखेरीस महात्मा गांधी रस्त्यावरून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर येतील. दोन्ही फेऱ्या एकाच वेळी या ठिकाणी येऊन गोंधळाची स्थिती निर्माण होऊ नये म्हणून त्यांच्या वेळेतही बदल केले जाणार आहेत. काँग्रेस आघाडीची फेरी काँग्रेस कमिटीपासून निघून अशोकस्तंभ, रविवार कारंजा महात्मा गांधी रोडमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर जाईल. काँग्रेस आघाडीने फेरीनंतर प्रचार सभेलाही परवानगी मागितली आहे. राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांशी या संदर्भात चर्चा करण्यात आली. परस्परांशी समन्वय साधून लवकरच अंतिम निर्णय घेतला जाईल, असे जिल्हाधिकारी पाटील यांनी सांगितले.

अर्ज दाखल करण्याचा ‘मुहूर्त’
काही प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज भरण्यासाठी गुरुवारचा मुहूर्त निवडला असला तरी दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार हरिश्चंद्र चव्हाण बुधवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. निवडणूक अर्ज भरण्यासाठी यंदा उमेदवारांना सात दिवसांचा अवधी मिळाला, मात्र त्यातील दोन दिवस शासकीय सुटी असल्याने पाच दिवस खऱ्या अर्थाने उपलब्ध आहेत. त्यातही ज्योतिषी मंडळींकडून गुरुवारचा दिवस अशुभ, तर शुक्रवारचा दिवस शुभ मुहूर्त असल्याचे सांगितले गेल्याने काही अपवाद वगळता प्रमुख उमेदवारांनी शुक्रवारी अर्ज भरण्याची तयारी चालविली. या स्थितीत आम आदमी पक्षाचे उमेदवार विजय पांढरे हे गुरुवारी अर्ज दाखल करणार आहेत. शुभ-अशुभ मुहूर्त हा अंधश्रद्धेचा भाग आहे. त्यामुळे आपण स्वत: अशुभ मुहूर्तावरच उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले. नाशिक लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस आघाडीचे उमेदवार छगन भुजबळ आणि दिंडोरी मतदारसंघातील डॉ. भारती पवार हे शुक्रवारी संयुक्त फेरी काढून अर्ज दाखल करणार आहेत, तर मनसेचे उमेदवार डॉ. प्रदीप पवार आणि शिवसेना-भाजप-रिपाइं महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे हेदेखील शुक्रवारी शक्तिप्रदर्शन करून आपापले अर्ज दाखल करणार आहेत.

 

Story img Loader