वाशी रेल्वे स्थानकासमोरील बीएसईएल टॉवरमधील सहाव्या माळ्यावरील कार्यालयामध्ये आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. कार्यालयामध्ये असलेल्या फर्निचर आणि इतर साहित्यामुळे आगीने काही वेळातच जोर पकडला. ही आग इतकी भीषण होती की, रस्त्यावरूनदेखील तिच्या ज्वाळा स्पष्ट दिसत होत्या. या आगीत दोन कार्यालयांमधील सर्व साहित्य जळून खाक झाले असले, तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या कार्यालयांमध्ये अडकलेल्या तिघांना अग्निशमन जवावांनी सुखरूप बाहेर काढले.
शोरूम आणि आयटी कंपन्यांची मोठय़ा प्रमाणात कार्यालये आहेत. सहाव्या माळ्यावरील गाळा क्रमांक १० व ११ या कार्यालयांमध्ये अकराच्या सुमारास अचानक आग लागली. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. आग लागताच कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी कार्यालयाबाहेर धाव घेतल्याने मोठी जीवितहानी टळली. आगीची माहिती मिळताच वाशी अग्निशमन केंद्राच्या फायर जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. कार्यालयामध्ये असलेल्या लाकडी फर्निचर आणि इतर साहित्यामुळे आग काही वेळेतच मोठय़ा प्रमाणात पसरली. अग्निशमन दलाच्या जवानांनी मोठय़ा प्रमाणात पाण्याचा मारा सुरू करत आग आटोक्यात आणण्यास सुरुवात केली. मात्र धुराच्या लोटामुळे अडचणी निर्माण होत होत्या.
तब्बल तीन तासाच्या अथक परिश्रमानंतर आग आटोक्यास आणण्यास जवानांना यश आले. या कार्यालयामध्ये अडकलेल्या तीन कर्मचाऱ्यांची सुखरूप सुटका करण्यात आल्याची माहिती अग्निशमन अधिकारी विजय राणे यांनी दिली. आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसून दोन्ही कार्यालयांमधील सर्व साहित्य जळून खाक झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
शहरात अनेक गगनचुंबी इमारतींमध्ये अग्निशमन नियम धाब्यावर बसवले असल्याचे चित्र आहे. अनेक इमारतींमध्ये अग्निरोधक यंत्रणांचा अभाव असल्याचे फायर ऑडिटमधून यापूर्वीच समोर आले आहे. काही इमारतींमध्ये यंत्रणा असली तरी बंद स्थितीत आहे. यामुळे गंगनचुबी इमारतींत लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन जवानांना अथक परिश्रम करावे लागतात.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा