नववर्षांचा पहिलाच सण म्हणजे मकर संक्रात..लग्नाचे पहिले वर्ष असो किंवा घरात नवीन पाहुणा आलेला असो तर मकर संक्रांतीला आठवण होते ती हलव्याच्या दागिन्यांची. या हलव्यांच्या दागिन्यांत साखरफुटाण्यांसोबतच आता प्लास्टिकच्या रंगीबेरंगी मण्यांच्या दागिन्यांचीही भर पडली आहे. लहान मुलांसाठी मण्यांच्या दागिन्यांना पसंती देण्यात येत आहे, तर नववधूसाठी आजही साखरेच्या फुटाण्याचेच दागिने पसंत केले जात आहेत.
रंगीबेरंगी मण्यांपासून बनविलेले हे दागिने खरेदीकडेही ग्राहकांचा कल दिसून येत आहे. बाळाच्या बोरन्हाण कार्यक्रमासाठी मुख्यत: या दागिन्यांचा वापर ते करत आहेत. डोंबिवलीतील संध्या भावसार- सातपुते या गेली २५ वर्षे हलव्याचे दागिने बनवीत आहेत. जुन्याच फॅशनचा ट्रेण्ड आता नव्याने आला आहे. यात आता मण्यांच्या दागिन्यांचा ट्रेण्ड आला आहे. याविषयी त्या म्हणाल्या, काळानुरूप या दागिन्यांमध्येही बदल हे होणारच. सध्या आम्ही ४० प्रकारचे दागिने आम्ही बनवितो. त्यात आता हे आर्टिफिशिअल मण्यांचे दागिने आले असले तरी नागरिकांचा खरा ओढा हा हलव्याच्या दागिन्यांकडे आहे. त्याला पहिला मान आहे.
लहान मुलांना बोरन्हाण घालताना त्यांना हे दागिने घातले जातात, त्या वेळी ते दागिने पाघळून त्यांचे हात चिकट होण्याची शक्यता असते, त्यामुळे मण्यांच्या दागिन्यांचा वापर होतो. मात्र नववधूंसाठी आजही हलव्याचे दागिनेच खरेदी केले जातात.
निदान त्यांच्या मागणीवरून तरी तसेच दिसून येते. एक हजार रुपयांपासून ते पाच हजार रुपयांपर्यंतचे हे दागिन्यांचे सेट महाग असले तरी आवडीने खरेदी केले जात आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा