मकर संक्रातीच्या दिवशी पतंगप्रेमींमधील अभूतपूर्व उत्साह सकाळपासून वाहणाऱ्या वाऱ्याने द्विगुणित केला. गुरुवारी आसमंतात पतंगींचा विहार आणि ढोलताशाच्या गजरात ‘गै बोलो रे धिना..’च्या आवाजाने वातावरण भारून गेले. जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या ‘येवला पतंगोत्सव’मध्ये सामील होण्यासाठी आलेल्या दूरवरच्या पर्यटकांची भर पडली.
मकर संक्रांतीला आता गोडव्याबरोबरच पतंगांमुळे उत्साह आणि उत्सवाचे स्वरूप आले आहे. हा उत्सव बच्चेकंपनीसोबत आबालवृद्ध आणि सर्वच कुटुंबीय उत्साहाने साजरा करतात. त्याचे प्रत्यंतर आदल्या दिवशी पतंग व मांजाखरेदीला उसळलेल्या गर्दीवरून आले होते. शहरातील बाजारपेठेत मिकी माऊस, गरुड, विमान, धोबी, वटवाघूळ आदी विविध प्रकारच्या पतंगांची मोठय़ा प्रमाणात खरेदी झाल्यामुळे मकर संक्रांतीला पतंगप्रेमींची एकच धूम राहणार असल्याचे स्पष्ट झाले होते. मागील वर्षी वारा नसल्याने पतंगोत्सवाचा फारसा आनंद नाशिककरांना लुटता आला नव्हता. पण यंदा ही कसर भरून निघाली. सकाळपासून बच्चेकंपनी कुठे इमारतीवर तर कुठे खुल्या मैदानात पोहोचली होती. वारा असल्याने नऊ वाजेपासून आकाशात पतंगांची भरारी दृष्टिपथास पडू लागली.
वारा असल्याने चिनी बनावटीचेआकाराने मोठे असणारे कापडी पतंग आकाशात विहरत होते. संक्रांतीसाठी अनेकांनी शेकडो रुपये खर्च करून पांडा, बरेली, फरिदबेग, सहातारी, नऊतारी आदी वेगवेगळ्या प्रकारच्या मांज्यांची खरेदी केली होती. इतकेच नव्हे तर मध्यवस्तीतील वाडे आणि शहरातील काही इमारतींवर खास ढोल अथवा ‘डीजे’ची व्यवस्था करण्यात आली. काही कुटुंबीयांनी संपूर्ण दिवस गच्चीवर थांबण्यासाठी भोजन व्यवस्थाही त्याच ठिकाणी केली.
दुपापर्यंत आकाश विविधरंगी पतंगांनी अक्षरश: भरून गेले. परस्परांचे पतंग काटण्याची स्पर्धा सुरू होती. प्रतिस्पध्र्याचा पतंग कापल्यावर लगेच त्या त्या गच्चीवरून ‘गौ बोलो रे धिना..’चा घोष होत होता. अनेक ठिकाणी जोडीला ढोल व डीजेची व्यवस्था असल्याचे पाहावयास मिळाले.
सायंकाळी उशिरापर्यंत घोष वाढतच गेला. दरम्यान, ‘तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला’ अशी विनंती करत घरोघरी बच्चेकंपनी भ्रमंती करत होती. तिळगुळवाटप करण्याची संस्कृती अद्याप कायम असली तरी शुभेच्छा देण्याकरिता लघुसंदेश आणि व्हॉट्सअॅपचा लक्षणीय वापर झाला.
गै बोलो रे धिना.. खास
मकर संक्रातीच्या दिवशी पतंगप्रेमींमधील अभूतपूर्व उत्साह सकाळपासून वाहणाऱ्या वाऱ्याने द्विगुणित केला. गुरुवारी आसमंतात पतंगींचा विहार आणि ढोलताशाच्या गजरात ‘गै बोलो रे धिना..’
First published on: 16-01-2015 at 03:11 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Makar sankranti celebrated in nashik