मकरसंक्रांतीनिमित्त विदर्भासह विविध जिल्ह्य़ांत उत्साहाच्या वातावरणात आबालवृद्धांनी पतंग उडविण्याचा आनंद घेतला. नायलॉन मांजावर विविध सामाजिक संघटनांसह पोलिसांनी बंदी आणलेली असताना बाजारात या मांजाची मोठय़ा प्रमाणात विक्री झाल्याचे दिसून आले. मांजामुळे दोन दिवसात अनेक पक्षी जखमी झाले. पतंगांमुळे सहा लोक जखमी झाले तर एक जण दगावल्याची घटना शहरात घडली आहे.
हवेत गारवा असला तरी गारठय़ामुळे महाल, इतवारी, रेशीमबाग, गोकुळपेठ, प्रतापनगर, सक्करदरा सीताबर्डी या भागात सकाळी ९ वाजेपर्यंत फारसा उत्साह दिसून आला नाही. अनेकांनी ऊन्ह आल्यावर छतावर पतंग उडवायला सुरुवात केली. सकाळी १० नंतर मात्र आकाशात रगबेरंगी पतंग दिसू लागले. पेच लढविल्या जात होत्या. इमारतीवरून ‘ओ काट..’ अशी युवकांची आरडाओरड सुरू झाली. टेरेसवर येऊन पतंग उडविण्याचा आनंद घेत असताना युवकांचा जल्लोष दिसून आला. सीडी प्लेअवर गाणी वाजविली जात होती.
दुपारनंतर शहरातील विविध भागात आकाश रंगबेरंगी पतंगांनी बहरले होते. रेशीमबाग, महाल कस्तुरंचद पार्क, रामनगर आदी भागात पंच लढविण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. प्रतिस्पध्र्याची पतंग कापण्यासाठी व्यूहरचना आखली जात होती. ताण असणाऱ्या पतंगांना कोणता दोरा वापरायचा, खेचण्यासाठी कोणता धागा साथ देईल, तसेच भरपूर ढील देऊन समोरच्याचा पतंग कसा काटता येईल या पद्धतीने प्रत्येकजण प्रयत्न करीत होते. अनेकांनी दोन तीन डझन पतंग खरेदी करून ठेवून त्याला आधीच जोतरंग अर्थात सुत्तर बांधून ठेवल्यामुळे एक पतंग कटली की लगेच दुसरी पतंग उडविली जात होती. शहरातील अनेक वाहतुकीच्या रस्त्यावर लहान मुले हातात काठी घेऊत पतंग पकडण्यासाठी सैरावरा धावत होते. मात्र, त्यांना कोणीच रोखत नव्हते. कटलेली पतंग पकडण्यासाठी टेरेसवर उभे असलेले युवक धडपड करीत होते. दुपारी १ नंतर पतंग उडविण्याचा जोश कमी झाला. दुपारी ४ नंतर पुन्हा आकाशात रंगबेरेगी पतंग दिसू लागले. एकदा सकाळी टेरेसवर गेल्यावर सायंकाळी अंधार पडेपर्यंत खाली न येण्याचे मनसुबे रचले जात असताना खाण्याचे हाल होऊ नये म्हणून अनेक कच्चा चिवडय़ाचे बेत आखले होते. लहान मुले टेरेसवर चढून पतंग उडवत असल्यामुळे या धामधूमीत ‘जरा सांभाळून’ असा इशारा वडीलधारी मंडळी देत होती.
अपघाताच्या घटना
शहराच्या विविध भागात उत्साहाच्या वातावरणात पतंगोत्सव सुरू असताना काही अपघाताच्या घटना घडल्यामुळे अनेकांच्या आनंदावर विरजण पडले.
धंतोली हद्दीत दंतेश्वरी झोपडपट्टी भागात चंद्रकात सावरे हा छतावर पतंग उडवत असताना त्यांचा मांजा विजेच्या तारेवर लटकला. चंद्रकातने तो मांजा काढण्यासाठी तारेला स्पर्श करताना त्याला धक्का लागल्याने बेशुद्ध झाला. छतावर असलेल्या त्यांच्या मित्रांनी आणि परिवाराने त्याला ऑरेंज सिटी रुग्णालयात दाखल केले असताना डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
रेशीमबाग चौकात पतंग पकडण्यासाठी गेलेल्या बारा वर्षीय युवकाला एका दुचाकी वाहनाने धडक दिल्याने त्यात तो जखमी झाला आहे. गेल्या दोन दिवसांत सहा कबुतर आणि दोन घुबड जखमी झाली.
एमआयडीसी भागात जखमी झालेल्या घुबडाला मांजामुळे जास्त जखम झाल्यामुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा