संक्रांतीचा गोडवा महागाईमुळे तिखट
गरूड. मिकी माऊस.. विमान.. धोबी. वटवाघूळ.. आदी प्रकारच्या पतंगांची मकरसंक्रातीला आकाशात एकच गर्दी होणार आहे. यंदा चायनीज पतंगी आणि नायलॉन धागे यावर विक्रेता व ग्राहकांनी बहिष्कार टाकल्याने पूर्वापार चालत आलेल्या धोबी, येवला पतंगीसह प्लास्टिकच्या पतंगांना ग्राहकांची विशेष पसंती लाभत आहे. आगामी निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर, काही राजकीय पक्षांचे नेतेही पतंगीवर झळकत आहेत. दुसरीकडे तीळ आणि गुळाचे वाढलेले भाव यामुळे अनेकांनी तिळाच्या लाडूला पर्याय म्हणून साखर हलवा, तिळाची पोळी आदी पर्याय स्विकारला आहे.
आबालवृद्धांसह बच्चे कंपनीची पतंग व मांजा खरेदीसाठी सध्या रविवार कारंजा, घनकर लेन, शनिवार पेठ, कानडे मारूती व भद्रकाली परिसरातील प्रमुख दुकानांवर चांगलीच गर्दी उसळली आहे. गत वर्षीपासून जिल्हा प्रशासनासह नाशिक जिल्ह्यातील पतंग विक्रेता संघटनेने नायलॉन धाग्यावर बंदी आणण्याचा निर्णय घेतला आहे. नायलॉन धाग्याचे वाढते प्रस्थ, त्यामुळे होणाऱ्या दुखापती पाहता हा धागा बाजारातून बाद करण्यासाठी पर्यावरणप्रेमी आग्रही आहेत. या पाश्र्वभूमीवर, विक्रेत्यांनी नायलॉन धाग्याच्या खरेदी-विक्रीकडे पाठ फिरवली आहे. सध्या विमानाच्या आकारातील चिनी पतंगींसह बलून आकारातील पतंग सर्वाचे लक्ष वेधून घेत आहे. या शिवाय मोठय़ा आकारातील गरूड, घुबड, सापाच्या आकारातील विविध चिनी पतंगीही बाजारात दाखल झाल्या आहेत. मात्र, मोजक्याच ग्राहकांकडून त्यांची पसंती मिळत आहे. विशेष करून बरेली, धोबी, येवला या कागदी पतंगांची चलती आहे. बच्चे कंपनीची आवड लक्षात घेता प्लास्टिकच्या पतंगीवर छोटा भीम, छोटा हनुमान, बार्बी, डोरोमन असे कार्टुन्स लावण्यात आले आहे. तसेच आगामी निवडणुका पाहता, राजकीय पक्ष चिन्हे, नेते असलेले काही पतंगी बाजारात दाखल झाल्या आहेत. बाजारात सर्वसाधारणपणे दोन रूपयांपासून २०० रुपयांपर्यंत कागदी पतंगी आणि कापडी पतंगी ५०० ते १००० रुपयांपर्यंत विक्रीस आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यंदा पतंगींच्या किंमतीत १०-२० टक्के वाढ झाली असली तरी ग्राहकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभत असल्याचे पतंग विक्रेते अप्पा देवरगांवकर यांनी सांगितले.
पतंगप्रेमींकडून पांडा धाग्याला चांगली मागणी आहे. १४० ते २५० रूपये रिळ असे त्याचे दर असून बरेली हा धागा साधारणत: १०० रूपये, मैदानी १४० रुपयांपासून उपलब्ध आहेत. सहा तारी, नऊ तारी व बारा तारी यावरून मांज्याचे दर ठरतात. पांडा प्रकारातील ‘फरिदबेग’ या ३५० ते ४०० रूपये असा दर असणाऱ्या मांज्याला ग्राहकांकडून पसंती मिळाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
संक्रातीचा गोडवा वाढविणाऱ्या तीळगुळाला दरवाढीमुळे पर्याय शोधण्याचे काम दुसरीकडे सुरू आहे. तीळ साधारणत: २८० रुपये किलो दराने विकली जात असल्याने ग्राहकांनी तीळकुटला पसंती दिली. तयार असलेली तिळाची पोळी, राजगीरा व तीळ यांचे मिश्रण असलेले लाडू सध्या ४० ते ९० रुपये दराने विकले जात आहे. तसेच तीळगुळाला पर्याय म्हणून रेवडीकडे पाहिले जात आहे. महागाईच्या काळात पारंपारिक तीळगुळ पोळी हद्दपार झालेली दिसुन येते. महिला वर्गाने तयार साखर हलवा आणि लाडुला पसंती दिल्याचे चित्र बाजारपेठेत पहावयास मिळत आहे.

पक्षांच्या बचावासाठी खास पथक
मकर संक्रांत उत्सव साजरा करताना नायलॉन मांज्यामुळे अनेक अपघात होतात. त्यामुळे निसर्ग साखळीतील महत्वाचा घटक असणारे पक्षी जखमी होण्याचे अनेक प्रकार घडतात. त्यात काही वेळा त्यांना जीवही गमवावा लागतो. पतंग उडविण्यासाठी खुल्या मैदानाचा वापर करणे गरजेचे आहे. गच्चीवरून पतंग उडवू नये, असे आवाहन नेचर क्लब ऑफ नाशिकने केले आहे. तसेच नायलॉन मांजा लवकर कुजत नसल्याने तो वर्षभर झाडावर तसाच लटकून राहतो व त्यामध्ये अनेक पक्षी अडकून जखमी होतात व काही दगावतात देखील. जखमी पक्ष्यांना त्वरित वैद्यकीय मदत मिळावी म्हणून यंदा नेचर क्लब ऑफ नाशिकने खास पथक स्थापन केले आहे. शहरात कुठेही जखमी पक्षी आढळल्यास नागरिकांनी प्रा. आनंद बोरा ९८२२२ ८६७५०, नाशिकरोडसाठी शेखर गायकवाड ९४२२२ ६७८०१, सिडको – मनिष गोडबोले ८४४६३ १६३१६ आदी क्रमांकांवर संपर्क साधावा अथवा नजीकच्या वन विभाग कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन नेचर क्लबचे प्रा. आनंद बोरा यांनी केले आहे.

Story img Loader