रेल्वेतून प्रवास करताना अनेकदा खानपान सेवेबाबत प्रवाशांच्या तक्रारी असतात. कधी जेवण खराब असते तर कधी जेवण पुरविणारी मंडळी प्रवाशांशी गैरव्यवहार करत जादा पैसे उकळतात. आता या तक्रारींची दखल घेण्याचे पश्चिम रेल्वेने मनावर घेतले आहे. त्यासाठी पश्चिम रेल्वेने खास दूरध्वनी क्रमांक सुरू केला असून रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी या तक्रारींची दखल घेणार आहेत.
लांब पल्ल्याच्या गाडय़ांमधील खानपान सेवेच्या दर्जाबाबत अनेकदा तक्रार करण्यासाठी प्रवासी पुढे येत नाहीत. प्रवाशांना ही सेवा पुरविणाऱ्या मंडळींकडून धमक्या दिल्या जातात. एखाद्या प्रवाशाने तक्रार केलीच तर रेल्वेकडून त्याची दखल वेळेत घेतली जातेच असाही अनुभव येत नाही. मात्र आता त्याबाबत पश्चिम रेल्वेने पुढाकार घेतला असून प्रवाशांना चांगली सुविधा यापुढे देण्यात येईलच पण त्याची दखल घेऊन संबंधितांवर कारवाईही करण्यात येईल, असा विश्वास पश्चिम रेल्वेने दिला आहे. त्यासाठी ९००४४४१९५५ या क्रमांकावर दूरध्वनी करून किंवा लघुसंदेश (एसएमएस) करून प्रवासी आपली तक्रार करू शकतात. त्याचबरोबर cateringcomplaint@wr.railnet.gov.in  या मेलवरही प्रवासी आपली तक्रार नोंदवू शकतात. हा क्रमांक आणि मेल सुरू झाला असून प्रवाशांच्या आरक्षित तिकीटाच्या मागील बाजूस तसेच आरक्षण केंद्रांवरही ते प्रकाशित करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
त्याचबरोबर रेल्वे बोर्डानेही एक विशेष टोल फ्री क्रमांक (१८००१११३२१) सुरू केला असून त्यावरही तक्रारी नोंदता येतील. मात्र हा क्रमांक सकाळी सात ते रात्री १० वाजेपर्यंतच सुरू असेल. इतरवेळी प्रवाशांनी आपल्या तक्रारी स्थानक प्रमुख, खानपान सेवा पुरविणारे स्टॉल किंवा पॅन्ट्रीकार व्यवस्थापक यांच्याकडील तक्रार पुस्तिकेत आपल्या तक्रारी नोंदवाव्यात असे रेल्वेचे म्हणणे आहे.

Story img Loader