वाचन म्हणजे जीवनाला उन्नत करणारी बाब असून यामुळे बुध्दीची मशागत होते. माणसाचे जीवन फुलवण्यात वाचनाचा महत्त्वाचा वाटा असतो. यामुळे वाचनाचा छंद जोपासून आपले जीवन समृद्ध करा, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी कल्याण येथे केले. येथील सार्वजनिक वाचनालयातर्फे कोत्तापल्ले यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या वेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. या वेळी प्रसिद्ध शिल्पकार भाऊ साठे, संस्थेचे अध्यक्ष राजीव जोशी, उपाध्यक्ष मिलिंद कुलकर्णी, भिकू बारस्कर उपस्थित होते. पुस्तके वाचून पोट भरत नसले तरी मन भरते, असे कोत्तापल्ले यांनी सांगितले. ज्ञानात वाढ करण्यासाठी वाचन हा एकमेव मार्ग आहे, असे त्यांनी सांगितले. प्रत्येकाला घरात पुस्तके ठेवून वाचणे शक्य नसले तरी ग्रंथालयात जाऊन ती वाचता येतात. यासाठी शासनाने ग्रंथालयांचा विकास करण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. ज्या देशात मोठी वाचनालये असतात, तोच देश प्रगती करू शकतो. भारतात आजही वाचनसंस्कृती आणि ग्रंथालयांच्या विकासाला फारसे महत्त्व दिले जात नाही, याची खंत कोत्तापल्ले यांनी या वेळी व्यक्त केली. या वेळी वाचनालयाचे माजी अध्यक्ष अ. ना. भार्गवे यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास नागरिकांची मोठय़ा प्रमाणावर उपस्थिती होती.     

Story img Loader