आ. प्रा. शरद पाटील यांचे आवाहन
वादग्रस्त तहसीलदार शिवकुमार आवळकंठे यांच्याविरुद्ध झालेल्या तक्रारींची दखल घेत त्यांची नाशिक येथे बदली करण्यात आली असून, त्यांच्या कारकीर्दीत झालेल्या छळवणुकीविषयी लेखी स्वरूपात अपर जिल्हाधिकारी किंवा आपल्या कार्यालयात आठ दिवसांच्या आत तक्रारी पाठवाव्यात असे आवाहन आ. प्रा. शरद पाटील यांनी पत्रकान्वये केले आहे.
धुळे येथे तहसीलदार म्हणून रुजू झाल्यानंतर आवळकंठे यांनी एका राजकीय पुढाऱ्याच्या आदेशाने धुळे ग्रामीण भागातील जनतेला अधिक त्रास दिल्याचा आरोप आ. शरद पाटील यांनी केला आहे. अनुदानाच्या योजना बंद करणे, शेत-शिवार रस्त्यांसंदर्भात बेकायदेशीरपणे निकाल देणे, सहकारी संस्थेने हडप केलेल्या जमिनी अवसायनात निघालेल्या संस्थांना परत करून मूळ शेतमालकांवर अन्याय करणे, दलित आदिवासींसाठी असणाऱ्या जमिनींना विक्रीसाठी बेकायदा परवानगी देणे, स्वस्त धान्य दुकानदारांकडून तपासणीच्या नावाखाली पैसा जमा करणे, अंत्योदय योजनेचे कार्ड रद्द करणे अशा अनेक गंभीर तक्रारींमुळेच आवळकंठे यांची बदली करण्यात आल्याचा दावा आ. पाटील यांनी केला आहे.
आपण त्यांच्या तक्रारी पुराव्यासह मुख्यमंत्री व महसूलमंत्री यांच्याकडे १७ एप्रिल रोजी लेखी स्वरूपात सादर केल्यानंतर आवळकंठे यांची स्वतंत्रपणे चौकशी करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांना देण्यात आल्याचेही आ. पाटील यांनी म्हटले आहे. नाशिक विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून आठ मे रोजी शासनाने अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय समिती नियुक्त केली आहे. ही समिती आवळकंठे यांच्या विरोधात आलेल्या तक्रारींची सविस्तर सखोल चौकशी करणार असून आवळकंठे यांच्यामुळे त्रास झालेल्यांनी या समितीपुढे लेखी व गुप्त स्वरूपात आपल्या तक्रारी द्यावयाच्या आहेत. आठ दिवसांच्या आत या तक्रारी अपर जिल्हाधिकारी, धुळे किंवा आ. प्रा. शरद पाटील यांच्या कार्यालयाकडे पोष्टाने किंवा समक्ष सादर कराव्यात असे आवाहन करण्यात आले आहे.
तक्रारदारांचे नाव गुप्त राखले जाणार आहे. प्रशासनात भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांची संख्या वाढत आहे. अशा प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी ही तक्रार करण्यात आल्याचे आ. पाटील यांनी म्हटले आहे.
प्रशासनातील चिखलीकर शोधून काढण्यासाठी जनतेने अशा अधिकाऱ्यांबाबत निर्धास्तपणे तक्रारी सादर कराव्यात, असे आवाहन आ. प्रा. शरद पाटील यांनी केले आहे.
‘वादग्रस्त तहसीलदारांविरुद्ध लेखी तक्रारी कराव्यात’
आ. प्रा. शरद पाटील यांचे आवाहन वादग्रस्त तहसीलदार शिवकुमार आवळकंठे यांच्याविरुद्ध झालेल्या तक्रारींची दखल घेत त्यांची नाशिक येथे बदली करण्यात आली असून, त्यांच्या कारकीर्दीत झालेल्या छळवणुकीविषयी लेखी स्वरूपात अपर
आणखी वाचा
First published on: 20-06-2013 at 08:27 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Make written complaint letter agaisnt tahsildar