पोलीस ठाण्याच्या बाहेर पडलेल्या जप्त वाहनांचा ढिगारा, तंबाखू खाऊन अनेक ठिकाणी मारलेल्या पिचकाऱ्या, मनात येईल तशा पार्क केलेल्या गाडय़ा, दाटीवाटीने मांडलेली तुटलेली फुटलेली कपाटे व टेबलांची गर्दी, तक्रारदारांच्या स्वागताला प्रवेशद्वाराजवळ बसलेली भटकी कुत्री, कोंदट वातावरणामुळे येणारी दरुगधी, पिण्याच्या पाण्याचा नसलेला ठावठिकाणा, अस्वच्छतेचे प्रतीक असलेल्या कोठडय़ा, प्रवेश करताच ओकारी येणारी शौचालये, कागदपत्रांचे लालफितीत बांधून ठेवण्यात आलेले गठ्ठे यांसारखी पोलीस ठाण्यात दिसणारी दृश्ये बदलण्याचा विडा नवी मुंबई पोलीस आयुक्त के. एल. प्रसाद यांनी उचलला असून व्हिजन पोलीस स्टेशन अंतर्गत स्वच्छ, सुंदर पोलीस ठाणे करण्याचे आदेशच दिले आहेत. त्यामुळे नेरुळ, एपीएमसी, रबाले येथील पोलीस ठाणे चकाचक होऊ लागली असून यानंतर लवकरच तुर्भे, वाशी ही पोलीस ठाणे कात टाकणार आहेत.
नव्याने तयार होणाऱ्या पोलीस ठाण्यांची रचना आणि सुविधा या नव्या कल्पकतेने तयार केल्या जात असल्याने तळोजा पोलीस ठाण्यात चक्क व्यायामशाळा सुरू करण्यात आली आहे. पण ३०-४० वर्षांपूर्वीच्या पोलीस ठाण्यांचे करायचे काय, असा प्रश्न पोलीस आयुक्तांना सतावत होता.
रेल्वे, बस स्थानक, रुग्णालयासारखे पोलीस ठाणे हे एक सार्वजनिक ठिकाण आहे. तेथे येणारा सर्वसामान्य नागरिक हा स्वच्छ, सुंदर, निर्मळ वातावरणात वावरताना दिसला पाहिजे. पोलीस ठाण्यात येणाऱ्या अभ्यांगताबरोबरच घरापासून जवळपास १८ तास लांब राहणाऱ्या आणि जास्तीत जास्त काळ पोलीस ठाण्यात दवडणाऱ्या पोलिसाला हे वातावरण चांगले वाटले पाहिजे असा विचार करुन प्रसाद यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, पालिका, सिडको, उद्योजक, दानशूर व्यक्ती यांना पोलीस ठाण्यांचा मेकओव्हर करण्यासाठी मदत करण्याची विनंती केली. यात मेकओव्हर करण्यात आलेल्या एपीएमसी (माया मोरे), नेरुळ (संगीता शिंदे), रबाले (गोरख गोजरे) या अधिकाऱ्यांचा सिंहाचा वाटा आहे. खारघर पोलीस ठाणे बांधून तयार आहे. त्याच्या उद्घाटनाचा मुहूर्त शोधला जात आहे. अनेक पोलीस ठाण्यांच्या आवारात दिसणारे भंगार गाडय़ांचे ढीग एकतर गायब झाले आहेत किंवा नजरेआड करण्यात आले आहेत. त्यामुळे या जागा अभ्यांगताच्या वाहनांसाठी मोकळ्या झाल्या आहेत. पोलीस ठाण्याच्या भिंतींवर, कोपऱ्यात, टेबलावर दिसणारे धार्मिक अवडंबर दिसता कामा नये अशी ताकीद आयुक्तांनी यापूर्वीच दिली आहे. महिला पोलिसांच्या लहान छकुल्यांसाठी पाळणाघर सुरू करण्याच्या सूचना दिल्याने आता अनेक पोलीस ठाण्यात महिला पोलिसांच्या हातात दांडुका आणि एका हातात पाळण्याची दोरी असल्याचे दृश्य दिसून येत आहे. त्यामुळे यापूर्वी पोलीस ठाण्याची पायरी चढायला नको असे म्हणणारे देखील एक फेरफटका पोलीस ठाण्यात मारून येऊ लागले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा